Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टूथपेस्ट बदलता मग सरकार का नाही?- राज ठाकरे

टूथपेस्ट बदलता मग सरकार का नाही?- राज ठाकरे
दातांच्या आरोग्यासाठी आपण वारंवार टुथपेस्ट बदलत असतो. त्याचप्रमाणे जनसामान्यांच्या कल्याणासाठी सरकारही बदलण्याची सवय मतदारांनी लावून घ्यायला हवी, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. बुलडाणा येथे विदर्भातील आपल्या पहिल्याच सभेत ते बोलत होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून ६० वर्षापेक्षा जास्त काळ लोटला पण, आजही त्याच-त्याच मु्द्यांवर निवडणुका लढविल्या जात आहेत. तीच-तीच आश्वासने राजकीय पक्षांकडून दिली जात आहेत. पाणी, वीज, रस्ते आणि नोकर्‍या... ते बेशरमासारखे आपल्याला मूर्ख बनवित आहेत आणि आपण त्यांच्या या फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेऊन त्याच-त्याच पक्षाला निवडून देत आहोत, अशा कडक शब्दात मतदारांची कानउघाडणी ठाकरे यांनी केली.

इतक्या वर्षांपासून हे राजकीय पक्ष आपली आश्वासने का पूर्ण करीत नाहीत, हा साधा विचारही आपल्या मनात येत नाही. महाराष्ट्रात पाण्याची कमतरता आहे. वीज भरपूर आहे पण, २०-२० तास भारनियमन करण्यात येते. नोकर्‍या आहेत पण, त्या परप्रांतीयांसाठी आहेत. महाराष्ट्रातील ही अवस्था बदलायची असेल तर सरकार बदलण्याची नितांत गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या नसतात त्या आपण नेहमीच बदलवित असतो. त्याचप्रमाणे जे सरकार जनहितार्थ कार्य करीत नसेल, जनसामान्यांचे प्रश्न सोडवित नसेल ते सरकार बदलविणे ही चांगली सवय असताना आपण ती का अंगीकारत नाही, असा सवाल करीत, वीज, पाणी यासारखे मूलभूत मुद्दे निकाली निघत नाहीत तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या मुद्याला स्पर्श केला. एकाच दशकात विदर्भातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. विदर्भातील आत्महत्या रोखण्यासाठी स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग विदर्भाच्या दौर्‍यावर आले. पॅकेजही जाहीर केले. पण, आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या. यावरून पंतप्रधानांचे पॅकेज विशेष प्रभावी नव्हते हे स्पष्ट झाले आहे. या आत्महत्या रोखायच्याच असतील तर आधी वीज, पाणी, बेरोजगारी आणि शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव यासारख्या मुद्यांना प्रभावीपणे हाताळणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


Share this Story:

Follow Webdunia marathi