Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नव्‍या पाकिटात आघाडीचा जुनाच जाहीरनामा

नव्‍या पाकिटात आघाडीचा जुनाच जाहीरनामा
नियमितपणे कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शेतीसाठी सहकारी बँकांमार्फत ३ लाखांपर्यंतचे कर्ज ३ टक्के व्याजदराने देऊ, आगामी तीन वर्षात राज्य लोडशेडिंग मुक्त करू यासह दारिद्रयरेषेखालील नागरिकांना गहू, तांदूळ, ज्वारी आदी २५ किलोग्रॅम धान्य तीन रुपये प्रतिकिलो दराने देऊ आदी मागील निवडणुकीतीलच काही आश्‍वासने कायम ठेवत कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला. यावेळी काँग्रेस व राष्‍ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

आघाडीच्‍या जाहीरनाम्यात शेतकर्‍यांना त्यांच्या मालासाठी रास्त भाव देण्‍यासह महागाईवर नियंत्रणाचेही आश्‍वासन देण्‍यात आले आहे. शिवसेना आणि मनसेने पेटविलेल्या मराठीच्या मुद्यांचा मोह भाजपापाठोपाठ आघाडीलाही लागला असून जाहीरनाम्यात मराठी भाषेची भरभराट होण्यासाठी काही मुद्यांचा जाणून-बुजून समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यात मराठी पंधरवडा साजरा करणे, प्रशासनात मराठीचा वापर करणे आदी नवीन मुद्दे तेवढे टाकण्‍यात आले आहेत.

याशिवाय दारिद्रयरेषेखालील नागरिकांना गहू, तांदूळ, ज्वारी आदी तीन रुपये प्रतिकिलो दराने देण्याची जूनी घोषणाही करण्‍यात आली आहे. या शिवाय पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवी संरक्षित करण्यासाठी व वेळेवर परत करण्यासाठी पतसंस्था नियामक मंडळ स्थापन करणे, राज्यातील प्रमुख शहरे किमान चारपदरी रस्त्यांनी जोडणे, सर्व स्तरांवरील पंचायत संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे.

तर 'माहेर' या योजनेअंतर्गत मुलगी जन्मताच तिच्या नावावर योग्य अशी रक्कम 'फिक्स्ड डिपॉसिट'मध्ये ठेवण्यात येईल व ती सज्ञान होताच उच्च शिक्षण व लग्नासाठी तिला सव्वा लाख रुपये मिळवून देण्यात येईल. अनुसूचित जातीजमातीच्या महिला बचतगटांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन क्षेत्रात वाढ करण्यात येईल व अपूर्ण योजना कालव्यांसह पूर्ण करण्याची घोषणा करण्‍यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi