Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपच्या स्टार कँपेनर्सचा हल्लाबोल

भाजपच्या स्टार कँपेनर्सचा हल्लाबोल

वेबदुनिया

महागाई, शेतकर्‍यांची दुर्दशा, उद्योगात पिछेहाट ही पापे काँग्रेस आघाडी सरकारच्या नावावर आहेत. मात्र या पापांची जबाबदारी ढकलण्यात धन्यता मानणार्‍या काँग्रेसी नेत्यांना यंदा त्यांची जागा दाखवून असा सूर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या स्टार कँपेनर्सनी आळवला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान रविवारी भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभात उपस्थित होते. आपापल्या राज्यांच्या प्रगतीचा दाखला देत, गेल्या दहा वर्षातच महाराष्ट्राची पिछेहाट कशी झाली असा सवाल त्यांनी केला.

अमरावती येथील भाजपाचे उमेदवार डॉ. प्रदिप शिंगोरे यांच्या प्रचारासाठी मोदी, तर अमरावतीचेच लोणीकर यांच्या प्रचारासाठी आडवाणी यांनी आज उपस्थिती लावली. तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी शिवराजसिंग चौहान उपस्थित होते.

उद्योगक्षेत्रात एकेकाळी आघाडीवर असलेल्या महाराष्ट्र राज्याची सध्या अधोगती झाली आहे. या अधोगतीस काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसचे आघाडी सरकारच जबाबदार असून ही औोगिक अधोगती थांबविण्यासाठी सत्ताबदल आवश्यक असल्याचे आडवाणी यांनी सांगितले. नुकत्याच मिरज - सांगली येथे झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना, निरपराधांना तुरूंगात डांबून त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या काँग्रेस सरकारचे धोरण पैश्याच्या जोरावर स्तात टिकविण्याचेच आहे. त्यांचा हा समज खोटा ठरविण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल असा विश्वासही आडवाणी यांनी व्यक्त केला.

मराठीतून आपल्या भाषणाची सुरूवात करणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आपल्या आक्रमक परंतु खुमासदार शैलीत सत्ताधारी काँग्रेस आघाडीचा समाचार घेतला. सरकार नेहमी गरीबांचा बाजूचेच असले पाहिजे परंतु काँग्रेस आघाडीचे सरकार तर श्रीमंत धार्जिणे आहे असा आरोप करीत केंद्र सरकारचे कृषी खाते, ऊर्जा खाते हे महाराष्ट्रच्याच मंत्र्यांकडे आहे. गृहमंत्रालय देखील काही दिवसांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राकडे होते. मात्र या तिन्ही आघाड्यांवर महाराष्ट्रातील जनताच जास्त पोळलेली दिसते याचा अर्थ काय असा सवाल मोदी यांनी केला. काँगेस का हाथ आम आदमी के साथ ही काँग्रेसची घोषणा वास्तवात मात्र याउलट असल्याचे सांगत या खोटारड्या सरकारला उलथून टाका असे आवाहन मोदी यांनी केले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काँग्रेसी जाहीरनाम्याची टिंगल करताना, जाहीरनामा तयार करण्यासाठीसुद्धा शिवसेना - भाजपाच्याच वचननाम्याचा उपयोग करावा लागतो असे सांगितले. एकेकाळी वीजउत्पादनात महाराष्ट्रापेक्षाही पिछाडीवर असलेल्या मध्यप्रदेशात आज मुबलक वीज उपलब्ध आहे मात्र महाराष्ट्राची अवस्था मात्र अधिक दयनीय झाल्याचे दिसते आहे. युतीचे सरकार सत्तेत आल्यास सर्वप्रथम वीजेच्या प्रश्नावर तोडगा काढून कृती केली जाईल असे आश्वासन चौहान यांनी दिले. यंदा निवडून येणारे शिवसेना - भाजपा युतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नागपूरात घेतलेली पत्रकार परिषद त्यांच्या चांगलीच अंगाशी आली. राज्यातील वीजेची कमतरता, कर्जाचा बोजा, महागाई यासाठी १९९५ च्या शिवसेना - भाजपा युती सरकारला जबाबदार धरताना माणिकरावांनी यंदाही जनता आम्हालाच निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी झालेल्या प्रश्नोत्तरांत उपस्थित पत्रकरांनी ठोस आकडेवारी सादर करत वरील सर्व समस्यांना काँग्रेस आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे सिद्ध केले. दहा वर्षे सत्ता उपभोगलीत, आता आणखी किती दिवस शिवसेना - भाजपावर आरोप करून आपली जबाबदारी झटकणार आहात असा संतप्त सवालही काही पत्रकारांनी माणिकरावांना केला. अचानक झालेल्या या बौद्धिक हल्ल्याने भांबावून गेलेले माणिकराव पत्रकारांच्या परखड प्रश्नांपुढे निरूत्तर झाले. परंतु त्यांनी काँग्रेस आघाडी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार असा घोषा लावला. त्यावर पत्रकारांनी त्यांना शनिवारी सोनिया गांधींच्या नागपूर मधील फ्लोप झालेल्या सभेची आठवण करून देत त्यांची आणखी कोंडी केली. परिस्थिती माणिकरावांच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे लक्षात येताच मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषद आवरती घेत, माणिकरावांसमवेत तेथून अक्षरशः पळ काढला.

Share this Story:

Follow Webdunia marathi