विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२००९ साठी मतदारांना मतदान करताना भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र हे ओळखपत्र नसल्यास इतर चौदा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सादर केल्यास त्यास मतदानासाठी अनुमती देण्यात येईल. असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
एखाद्या मतदाराने, अन्य विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकार्याने दिलेले छायाचित्र ओळखपत्र सादर केले तरी तो मतदार ज्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आला आहे त्या मतदान केंद्राच्या मतदार यादीत त्याचे नाव असल्यास त्याला मतदान करता येईल.
ज्या मतदारांना निवडणूक आयोगाचे छायाचित्र ओळखपत्र प्राप्त झालेले नाही अथवा अन्य कारणांमुळे मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवू शकत नाही, अशा मतदारांनी आपली ओळख पटविण्यासाठी स्वत:चे छायाचित्र असलेले खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र मतदान केंद्राध्यक्ष अथवा ओळख पटविण्यासाठी नियुक्त केलेल्या मतदान अधिकार्यांना दाखवून आपली ओळख पटविल्यास संबंधित मतदान करू शकतील.
भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त पर्यायी ओळखपत्र म्हणून जे दस्तऐवज ग्राह्य मानण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, त्याची माहिती अशीः
पर्यायी ओळखपत्रे
मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त पर्यायी ओळखपत्र म्हणून ग्राह्य असणारे दस्तऐवज -
पासपोर्ट
वाहन चालविण्याचा परवाना
आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र
राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना दिलेली छायाचित्र असलेली ओळखपत्रे
खातेदारांचे छायाचित्र असलेले दि.३१.८.२००९ पर्यंत दिलेले बँकेचे/पोस्टाचे पासबूक
छायाचित्र असलेले स्वातंत्र्य सैनिकांचे ओळखपत्र
छायाचित्र असलेले सक्षम प्राधिकार्याने दि.३१.८.२००९ पर्यंत दिलेले अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र
छायाचित्र असलेला सक्षम प्राधिकार्याने दि.३१.८.२००९ पर्यंत दिलेला अपंगत्वाचा दाखला
दि. ३१.८.२००९ पर्यंत दिलेला छायाचित्र असलेला शस्त्रपरवाना
दि. ३१.८.२००९ पर्यंत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यंत्रणेमार्फत छायाचित्रासह दिलेले जॉबकार्ड
छायाचित्र असलेली मालमत्तेबाबतची कागदपत्रे (उदा.पट्टा, नोंदणीकृत कागदपत्रे इत्यादी)
छायाचित्रासह असलेले दि.३१.८.२००९ पर्यंत दिलेले निवृत्त कर्मचार्याचे पेन्शन पासबूक/पेन्शन पेमेंट ऑर्डर/ माजी सैनिक पेन्शन पासबूक/ माजी सैनिक पत्नी/ अवलंबित व्यक्ती प्रमाणपत्र व वयोवृद्ध निवृत्ती वेतन आदेश, विधवा निवृत्ती वेतन आदेश
छायाचित्र असलेले आरोग्य विमा योजनेचे स्मार्ट कार्ड (कामगार मंत्रालयाची योजना दि.३१.८.२००९ पर्यंत निर्गमित केलेले) आणि,
दिनांक ३१.८.२००९ पर्यंत देण्यात आलेले रेशन कार्ड यांचा समावेश आहे.
तसेच...
मतदाराला दिलेले छायाचित्र ओळखपत्र किंवा वरीलपैकी कोणतेही कागदपत्र फक्त कुटुंबप्रमुखाच्या नावे असेल व त्या कुटुंबातील अन्य मतदार त्या व्यक्तीसह एकाचवेळी जर मतदानासाठी मतदान केंद्रावर हजर असतील तर अशावेळी सदरच्या कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबातील व्यक्तिंची ओळख पटविल्यास संबंधित मतदारांना मतदान करता येईल.
मतदारांनी याची नोंद घेऊन मतदानास येताना वरीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे व मतदानाचा हक्क बजावावा.