गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शांत झाली असून आज मतदार राजाचा दिवस आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्यक्ष मतदानास सुरूवात झाली असून त्यासाठी राज्यभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकांवर नक्षलवाद्यांनी टाकलेला बहिष्कार लक्षात घेता गढचिरोली, चंद्रपूर आणि गोंदीयात नीमलष्करी दलाच्या तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत.
राज्यातील 288 मतदार संघात 80 पक्षांचे 3559 तर 1820 अपक्ष उमेदवार रिंगणात असून सुमारे 7 कोटी 56 लाख मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. त्यासाठी 84 हजार 136 मतदान केंद्र उभारण्यात आले असून आघाडी सरकारच्या 39 मंत्र्यांच्या भाग्याचा निर्णय मतदार राजा करणार आहे.
राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 वर्षांपासून उपभोगत असलेली सत्ता कायम राखण्यात यश येते की सत्ता भाजप-सेना युतीच्या ताब्यात जाते. हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार असले तरीही यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिडालोसची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
मनेसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठीच्य मुद्यावरून पेटलेली ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्वाची ठरणार असली तरीही राज यांच्यासाठी ती विशेष महत्वाची ठरणार आहे. तर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे लढली गेलेली ही निवडणूक त्यांच्यासाठीही तितकीच महत्वाची ठरणार आहे. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जुगलबंदी आणि पक्षापक्षांमधील बंडखोरी यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली आहे. तर परिवारवादही या निवडणुकीतून मोठ्या प्रमाणावर समोर आला आहे.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता मतदान करणार असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती सामनांचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज सुटी जाहीर करण्यात आली असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, विदर्भातील ६२ पैकी पाच मतदारसंघात मंगळवारी मतदान दोन तास लवकर संपेल. हे पाचही मतदारसंघ नक्षलवादी कारवायांच्या छायेतील असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमगाव, अर्जुनी मोरगाव ( दोन्ही गोंदिया जिल्हा), आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी (तिन्ही गडचिरोली जिल्हा) हे ते पाच मतदारसंघ आहेत. या पाचही मतदारसंघात मतदान सकाळी सातलाच सुरू होईल. मात्र ते दोन तास आधी म्हणजे दुपारी तीनलाच संपेल.
गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वोटींग मशीन आणि मतदान केंद्र अधिका-यांना तीन हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे बुथवर पोहचविण्यात आले असून जिल्ह्यातील 44 मतदान केंद्रावर बुलेटप्रुफ वाहन आणि अत्याधुनिक शस्त्रांसह बीएसएफच्या 45 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.