Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विरोधक जनतेच्या भावनांशी खेळतात- सोनिया

विरोधक जनतेच्या भावनांशी खेळतात- सोनिया

वेबदुनिया

विरोधक राजकीय फायद्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळतात. पंरतु, देशातील सामाजिक ऐक्य राखण्यासाठी कॉंग्रेस आघाडीला विजयी करा असे आवाहन काँग्रेसाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी केले. काँग्रेस आघाडीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन निदर्शने केल्याने चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांना त्वरित अटक केली.

नांदेड शहरातील गुरू गोविंदसिंग स्टेडीयम येथे ही सभा झाली. श्रीमती गांधी म्हणाल्या, की, विरोधक राजकीय फायद्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळतात पंरतु, महाराष्ट्रातील जनता जागरूक आहे. गरीब आदिवासी यांच्यासह महिलांसाठी आमचे शासन नवनवीन योजना राबवित आहे. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बचत गटांना कमी व्याजाने कर्ज दिले. तसेच पंचायतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. कॉंग्रेस पक्षाच्या घोषणा पत्रानुसार यावेळी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचे काम करू असे त्या म्हणाल्या. आम्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज देण्याचे काम करत आहोत. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहील. म्हणूनच या आधीही शेतकर्‍यांचे ७१ हजार कोटीचे कर्ज आम्ही माफ केले. शेती मालाच्या भावाचे समर्थन मुल्य वाढविण्याचे कामही केले. हे यापूर्वी कधी झाले नव्हते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना देशातील सर्व जिल्ह्यांना लागू केली. त्यामुळे बेरोजगारांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला. आमच्या शासनाने गरिबांना २५ किलो धान्य देण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण तसेच शहरी लोकांच्या आरोग्य शिबिरसाठी आरोग्य विमा योजना लागू केली असे सोनियांनी यावेळी सांगितले.

राज्यातील कॉंग्रेस सरकार विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, १९९० च्या नंतर महाराष्ट्राच्या समर्थनाने केंद्रात मजबूत सरकार बनले आहे. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व त्यांच्या साथिदारांनी संपूर्ण राज्यात सर्वच क्षेत्राचा विकास केला आहे. यावेळी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाने केलेल्या कामाची माहिती देत यापूर्वी 'पहिले जिंकले राष्ट्र आता जिंकू महाराष्ट्र' अशी घोषणा करून प्रचंड प्रतिसाद मिळविला. यावेळी खासदार खतगावकर, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव ठाकरे, बी. आर.कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सभा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील उमेदवारांनी मतदारांना मार्गदर्शन करत निवडूण आणण्याचा आग्रह केला.

छावाची निदर्शने
सोनिया गांधी यांचे भाषण चालू असताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तेव्हा उपस्थित हजारो लोकांचे लक्ष त्याकडे वळले पोलिसांची धावाधाव झाली. यांनतर गोंधळ घालणार्‍यांना पोलिसांनी अटक केली. या सभेस मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार कमलकिशोर कदम आदी उपस्थित होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi