Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

निमंत्रण सगळ्या घरचं पण जेवायला जाऊ कुठं? अनिल गोटे

अनिल गोटे
, सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (15:07 IST)
आमदारकी मी कोणत्याही परिस्थितीत मिळवणार परंतु आमदारकी हे माझं स्वप्न नसून मंत्री पद दिलं तर धुळे शहराचं 50 वर्षांचं कल्याण मी करून देईन. तिकीट मिळवण्यासाठी सर्व जण सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. परंतु तिकीट देण्यासाठी सर्व पक्ष माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट अनिल गोटेंनी कार्यकर्ता मेळाव्यात केला. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वच पक्षांच्या सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर मी म्हणजेच अनिल गोटे आहेत. तब्बल 69.76 टक्के मतदान हे गोटेंनाच होणार म्हणजेच जनमत गोटेंच्या बाजूने आहे. त्यामुळे जनतेची हीच शक्ती मला कामी येत असून, जो पक्ष मला मंत्रीपद देण्याचा शब्द देईल, त्याच पक्षाचा आपण स्वीकार करू असेही ते यावेळी म्हणाले.
 
धुळे शहर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनेक दिवस विजनवासात असलेले आमदार अनिल गोटे आज निवडणुकांच्या तोडांवर प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांना सामोरे गेले. कल्याण भवनात त्यांनी मेळावा घेत कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली. अनिल गोटे कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले तर काहीही फरक पडत नाही. परंतु आपल्याला त्यांच्यासोबत राहणे गरजेचे असल्याचे मत सर्वांनीच यावेळी व्यक्त केले. दरम्यान, अनिल गोटे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की, अख्ख्या महाराष्ट्रात पक्षांतराला वेग आला आहे. केवळ सत्ता आणि लालसेपोटी अनेक जण आपल्या पक्षाशी प्रतारणा करीत अन्य पक्षात जात आहेत. परंतु धुळे शहर मतदारसंघ हा या सर्व बाबींना अपवाद आहे. धुळे शहर मतदारसंघात अनिल गोटेंचेच प्राबल्य राहणार आहे.
 
अन्य कुणाचेही चालणार नाही. कारण ज्यांच्या हाती सत्ता आहे ते लोकांना लुटण्याचे काम करीत आहेत. कट कारस्थान करीत आहेत. कारस्थान इतके भयानक की मी नदीपात्रात उभारलेली महादेवाची मूर्ती कोसळावी म्हणून नदीला तब्बल 27 फूट पाणी सोडण्यात आले. अख्ख्या आयुष्यात मी 27 फुटांपर्यंतची पाण्याची पातळी पहिल्यांदा पाहिली. पण याचे परिणाम काय झाले? मी उभारलेल्या संरक्षक भिंती उखडल्या नाहीत. शंकर महादेवाची कृपा म्हणावी कोणत्याही बांधकामाला धक्का लागला नाही. मूर्तीचा खडासुध्दा निघाला नाही. इतकेच काय तर संरक्षक भिंतींमुळे अनेक घरांमध्ये जाणारे पाणी थांबून महापुराचा धोका टळला. तुम्ही पाहिले असेल धुळयात फारसे नुकसान झाले नाही. मला वाटतं ही माझ्या विरोधकांनी घेतलेली एक परिक्षा होती आणि त्या परिक्षेत मी पास झालो. आताही तिकीटासाठी भांडणे होत असतांना मी निश्‍चिंत आहे. सर्वच पक्ष मला विचारताहेत, परंतु आता केवळ आमदारकी नव्हे तर आमदारकीसह कॅबिनेट मंत्रीपद दिले तरच विचार करणार असल्याची भावना अनिल गोटे यांनी यावेळी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार