विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर शिवाजीनगर येथील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनीही स्वत:च आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत फटाके फोडल्याचं पाहायला मिळालं.
भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदरासंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपने सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे यांना अवघड जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता मतदानानंतर निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयी मिरवणूक काढली आहे.
दुसरीकडे, खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग्ज झळकावलेत. सचिन दोडके आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारज्यामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे या मतदारसंघातून पिछाडीवर होत्या. तरीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निकालाआधीच विजयाचा दावा केला.
महापालिका निवडणुकीच्या निकालाआधी सुद्धा सचिन दोडके यांनी असेच फलक लावले होते. विशेष म्हणजे त्यावेळी पुण्यात भाजपची लाट असतानाही दोडके यांच्या प्रभागात मात्र चारही राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे याच कामगिरीची पुनरावृत्ती सचिन दोडके विधानसभा निवडणुकीतही करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.