भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत ठाणे येथे, झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नेते व नुकतेच भाजपात प्रवेश केलेले गणेश नाईक यांना स्टेजवर बसायला जागा न मिळाल्यामुळे नाईक त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे कार्यक्रम सोडून निघून गेले होते.
नवी मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४८ नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. पहिल्याच पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना स्टेजवर जागा न दिल्यामुळे ठाणे जिल्ह्यात याची जोरदार चर्चा रंगली होती. तर यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना देखील स्टेजवर बसायला जागा मिळाली नाही म्हणून त्यांनी यांनी स्टेजच्याखाली मांडी घालून बसणे पसंत केले होते.
भाजपचे देशातील केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकले त्याकरिता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यासाठी नाईक यांच्या नावाचा उल्लेख सूत्रसंचालकाने केला. मात्र मंचावर बसायला जागा उपलब्ध नसल्यामुळे नाईक यांनी या कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले.