Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाव रे तो व्हिडियो, राज ठाकरे यांच्या सभांची सुरुवात या तारखेला

लाव रे तो व्हिडियो, राज ठाकरे यांच्या सभांची सुरुवात या तारखेला
, मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:42 IST)
लोकसभेत कोणताही उमेदवार नसतांना सरकारवर जोरदार टीका करणारे राज ठाकरे यावेळी मात्र विधानसभेसाठी तयार झाले आहेत. त्यांचा पक्ष निवडणूक लढवत असून ते सभा घ्यायला सुरवात करणार आहे. भाजपला लाव रे तो व्हिडियो मधून जेरीस आणणारे राज यावेळी काय करणार आहेत या कडे सर्वांचे लक्ष आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ ऑक्टोबर रोजी प्रचाराचं नारळ फोडणार आहेत. मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याची घोषणा केली. तसेच ५ ऑक्टोबर रोजी पाहिली प्रचार सभा घेऊन जे बोललो नाही ते सगळं बोलणार, असेही त्यांनी म्हटले. 
 
या मेळाव्यात राज यांच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. तसेच नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही यावेळी मनसेत प्रवेश केला. मुंबईतील वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मनसे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
 
कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशी केल्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनीही राज ठाकरे ईडीच्या चौकशीनंतर शांत झाल्याचं म्हटलं होतं. पण अखेर राज ठाकरेंनी आज मौन सोडलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं सांगितलं. पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलं. अशाच पद्धतीने रोज चार-पाच नावं जाहीर करेन असं मिश्किल भाष्यही यावेळी त्यांनी केलं.
 
दरम्यान, पक्ष टिकवायचा असेल तर निवडणूक लढलीच पाहिजे, असा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळं मनसेमध्ये त्याबाबत गांभीर्यानं खल झाला. अखेर राज यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी तशी घोषणाही केली. मनसे फक्त निवडणूक लढणार नाही, तर जिंकणार, असं त्यांनी आज स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खासकरुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. मनसे १०० जागा लढवणार अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कांदा पेटला, होणार अजून महाग, शेतकरी वर्गाने थांबवले लिलाव