Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गायीची शिकार केली म्हणून बदला घेण्यासाठी आफ्रिकेतले मसाई करायचे सिंहांची शिकार

lion day
, गुरूवार, 4 जानेवारी 2024 (15:42 IST)
गीर अभयारण्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या गुराख्यांचं आणि तिथल्याच वनराज म्हणजे सिंहांचं जीवन हे सुसंवादाचं असल्याचं दिसतं. इथल्या सिंहांनी गुराख्यांच्या गायींची शिकार जरी केली तरी ते या प्राण्याविषयी कोणताही राग मनात धरत नाहीत.
 
पण तेच तुम्ही आफ्रिकेतील मसाई लोकांकडे पाहाल तर ते गाय मारल्याचा बदला घेण्यासाठी सिंहांची शिकार करतात. पण आता ते देखील या सिहांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
कित्येक शतकं लोटली असतील, पण मसाई आणि आफ्रिकन सिंहांमध्ये कायम संघर्ष पाहायला मिळाला. या दोघांनाही वाटतं ते एकमेकांपेक्षा सामर्थ्यवान आणि ताकदवान आहेत.
 
हेच त्यांच्या संघर्षाचं कारण आहे. परंतु अलिकडच्या वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे. कालांतराने ते मसाई परंपरेचा भाग बनले, समाजात अनेक प्रथा पडल्या.
 
सिंहाची शिकार करण्याची परंपरा
मसाई लोकांचा असा विश्वास आहे की ते एक हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात आले आणि जगात कुठेही गायी असतील तर त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
 
मसाई ही एक भटकी जमात आहे. समाजातील पुरुष गायींच्या शोधात वर्षानुवर्ष घरापासून दूर राहत असत. स्त्रिया एकत्र समुहाने राहात.
 
पुढे जेव्हा हे पुरुष गायी घेऊन घरी यायचे तेव्हा त्यांच्याकडे असणाऱ्या गायी आणि ते किती उंच उडी मारू शकतात, हे पाहून मुली त्यांच्याशी लग्न करायच्या.
 
केनियामध्ये 1977 पासून सिंहाच्या शिकारीवर बंदी आहे. मात्र मसाई तरुणाने सिंहाची शिकार केल्यानंतरच त्याला प्रौढ मानलं जायचं. हे शौर्याचं प्रतिक होतं.
 
मसाई जमातीतील मेत्तरंगा सैतोतीचे वडील आणि त्यांच्या भावांनी मिळून तब्बल पंधरा सिंहांची शिकार केली.
 
जमातीतील लहान मुलांना सिंहांच्या शिकारीच्या सुरस कथा ऐकवल्या जातात. त्यामुळे त्यांच्या मनात सिंहाच्या शिकारीची भावना जागृत होते.
 
सैतोतीने वयाच्या 19 व्या वर्षी सिंहाची पहिली शिकार केली. सिंह आणि सैतोती एकमेकांना भिडले. यात सिंहाची मादी आणि दोन पिल्लं जंगलात पळून गेले. पुढे त्याने या सिंहिणीचीही शिकार केली.
 
जेव्हा एखादा योद्धा सिंहाची शिकार करतो तेव्हा त्याला नवीन नाव दिलं जातं. सैतोतीला मेत्तरंगा हे नाव मिळालं, ज्याचा अर्थ 'प्रमुख' आहे. सैतोतीला आणखी चार सिंहांची शिकार करायची होती. मसाईने केलेली सिंहाची शिकार म्हणजे दोघांमधील संघर्ष समजला जातो.
 
जसं की शिकार करताना सिंहासाठी सापळा रचला जातो. शिकारी लपतो आणि सिंह जाळ्यात अडकल्यावर त्याची रायफलने शिकार केली जाते. पण मसाई लोक शस्त्र आणि भाल्यांनी सिंहांची शिकार करतात. यातून त्यांना आपलं सामर्थ्य दाखवून द्यायचं असतं. त्यामुळे सिंहांच्या एकूण संख्येत कोणताही मोठा बदल झाला नाही.
 
मसाई तरुणांचे केस लाल रंगाचे असतात आणि त्यांच्या माता मुंडण करतात. त्यानंतर हे मसाई-योद्धे बनतात. तर वडील हे समाजातील वरिष्ठ लोकांमध्ये उठबस करतात.
 
रिकामं पोट
मसाई लोक सामूहिक शेती करतात. अंबोसेली राष्ट्रीय उद्यान आणि मसाई लोकांच्या शेतजमिनीमध्ये कोणतंही कुंपण नाही. त्यामुळे त्यांना सिंह, बिबट्या किंवा इतर प्राण्यांची शिकार करता येते.
 
2006 मध्ये या खिंडीत सुमारे 20 लाख गुरं - ढोरं, सुमारे 100 सिंह आणि 35 हजार मसाई लोक राहत होते. सिंहांसाठी ही जागा फारच कमी होती, त्यामुळे त्यांनी गुरांची शिकार करण्यास सुरुवात केली. परिणामी, मसाई लोकांनी केवळ प्रौढ होण्याच्या परंपरेचं पालन करण्यासाठी नव्हे तर बदला घेण्यासाठी सिंहांची शिकार करण्यास सुरुवात केली.
 
बळाच्या व्यतिरिक्त सिंहांना विष देऊनही मारण्यात आलं. 42 सिंहांना दिसताच मारून टाकण्यात आलं. यामुळे अंबोसेलीतील सिंहांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं.
 
याच दरम्यान सैतोतीने चौथ्या सिंहाची शिकार केली. त्याला 75 हजार शिलिंगचा दंड ठोठावण्यात आला. सैतोती तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याच्या गायी गायब झाल्या होत्या. हे काम सिंहांनी केलं असणार याची त्याला खात्री होती.
 
सैतोतीने पायांचे ठसे पाहून सिंहांचा माग काढला. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर सैतोती जंगलात एका सिंहापर्यंत पोहोचला. सुमारे एक किंवा दोन मीटर अंतरावरून सैतोतीने त्याच्यावर भाल्याचा वार केला. हा भाला सिंहाच्या छातीत घुसला.
 
गायींची शिकार करणारा हाच सिंह आहे का? याची खात्री करण्यासाठी त्याने सिंहाचे पोट फाडले. पण ते रिकामं होतं. सिंहाचं रिकामं पोट पाहून सैतोतीला पश्चाताप झाला. त्याने आपल्या सहकारी मसाई तरुणांना सिंहाच्या शिकारीचा उत्सव साजरा करू नका असं सांगितलं.
 
मसाई योद्ध्यांमध्ये सिंहाची आयाळ आणि शेपूट सन्मानाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. म्हणून ते सिंहाच्या शिकारीनंतर या सर्व गोष्टी आपल्यासोबत घेतात. मात्र, सैतोतीने त्या दिवशी काहीही केलं नाही आणि सिंहाचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
 
तो शांतपणे घरी आला. त्यानंतर सैतोती महिनोनमहिने गप्प आणि एकटाच होता. दुसऱ्या तरुण योद्धांसोबत सिंहाच्या शिकारीला जाणं तो टाळू लागला. त्यामुळे साथीदारांनी त्याला भ्याड म्हणून टोमणे मारायला सुरुवात केली. या सर्व गोष्टींमुळे सैतोतीला फारच त्रास झाला. मात्र, सिंहाची शिकार न करण्याच्या निर्णयावर तो ठाम राहिला. इथून त्याचं आयुष्य बदलणार होतं.
 
शिकारी बनला रक्षक
याचवेळी परिसरात सिंहांच्या संवर्धनासाठी 'सिंह संरक्षक' कार्यक्रम असल्याचं सैतोतीला समजलं. शिकारी लोक सिंह आणि समुदायाचं रक्षण करतात ही त्याची मूळ संकल्पना होती.
 
मसाई समाजातील सन्माननीय शिकारी असलेल्या सैतोतीला यात सामील करून घेतल्यास समाजावर मोठा परिणाम होईल असं मूळ अमेरिकन संरक्षकांना वाटलं. त्यामुळे त्याला लगेचच या कार्यक्रमात सामिल करण्यात आलं.
 
पूर्वी सैतोती आणि त्याचे साथीदार शिकार करण्यासाठी सिंहाच्या मागावर जात असत, परंतु आता ते जंगलात गायी किंवा हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी त्यांचं कौशल्य वापरतात.
 
तसेच सिंह असलेल्या कोणत्या भागात जावं आणि कुठे जाऊ नये याविषयी समाजातील लोकांना जागरूक करण्याचं काम करतात. जे युवक सिंहाची शिकार करून आपलं शौर्य दाखवत होते, तेच आता त्यांचं रक्षण करून आपलं शौर्य दाखवत आहेत. सैतोतीच्या मते, सिंहांची शिकार करण्यापेक्षा त्यांचं संरक्षण करणं कठीण आहे.
 
वयाच्या 19 व्या वर्षी सैतोतीने पहिली शिकार केली होती. तेव्हाची सिंहाची बछडी आज मोठा झाली असून तिल 'नोसेकी' असं नाव देण्यात आलं आहे. तिच्या गळ्यात कॉलर बांधली आहे, जेणेकरून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
 
पूर्वी हे नाव सिंहाच्या शिकारीशी संबंधित होतं. आता हे नाव सिंहाच्या मागावर जाणाऱ्या मसाई तरुणाशी जोडलं गेलं आहे. त्यामुळेच जेव्हा सिंहाचा मृत्यू होतो तेव्हा मासाईमध्ये शोककळा पसरते.
 
2007 मध्ये पाच सिंह रक्षक होते, आज त्यांची संख्या 40 पेक्षा जास्त झाली आहे. सिंहांची संख्याही तिपटीने वाढली आहे. केनिया आणि टांझानियाच्या तुलनेत लायन गार्डियन भागात सिंहाच्या शिकारीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
 
सैतोती आता अर्ध-निवृत्त जीवन जगत आहे. हातोड्याची काळजी घेण्याबरोबरच नवीन पिढीच्या लढवय्यांपर्यंत आपलं ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात मसाई समुदायाच्या प्राचीन सांस्कृतिक चालीरीती आणि परंपरा आणि सिंह संवर्धनाच्या पद्धती यांचाही समावेश आहे.
 
बदल शाश्वत आहे
अलिकडच्या वर्षांत, मसाई मारा राष्ट्रीय उद्यानाजवळ राहणाऱ्या काही मसाई लोकांनी सफारीच्या माध्यमातून कमाई केली आहे.
 
मसाई तरुणांमध्ये साहसाची भावना निर्माण करण्यासाठी समाजातील वडीलधारी मंडळी, पर्यावरणवादी आणि स्वयंसेवी संस्था 'मसाई ऑलिम्पिक'चे आयोजन करतात. यात भालाफेक, उंच उडी, लांब उडी आणि धावणे यासारख्या शिकारीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक क्षमतांची चाचणी घेतली जाते. मसाई मुलीही रंगीबेरंगी कपडे आणि दागिने घालून या कार्यक्रमात सहभागी होतात.
 
मसाई जमातीत मुलींचा खतना केला जातो आणि नंतर मुलगी लग्नासाठी पात्र मानली जाते. लग्नानंतर त्यांचं शिक्षण बंद केलं जातं. मात्र, केनियामध्ये 2011 पासून या विधीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ही परंपरा सुरूच असून समाजातील एका तरुणीने त्याविरोधात आंदोलन केलं होतं.
 
टांझानिया आणि केनियाचे मासाई नेते माउंट किलीमांजारो भागात आढळतात. नाइस लंगट या त्यांना संबोधित करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी वृद्ध आणि तरुणांना स्त्री जननेंद्रियाच्या विच्छेदनामुळे होणाऱ्या व्याधींबद्दल जागरुक केलं आहे.
 
तेव्हापासून, हजारो मुलींना या प्रथेतून सूट देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व प्रथा, सण आणि परंपरा पाळल्या जातात.
 
आफ्रिका खंडाने गेल्या काही वर्षांत भयंकर दुष्काळ अनुभवला आहे. केनियाही त्याला अपवाद नव्हता. शेती आणि पशुधनावर अवलंबून असलेल्या मसाई समाजासाठी चारा सांभाळून ठेवणं कठीण होऊन बसलं आहे.
 
यासाठी ते ओसाड जमिनीवर अर्धचंद्राच्या आकाराचे खड्डे बनवतात. यात पाणी भरून गाईंसाठी चाऱ्याची निर्मिती करतात.
 
सैतोती सांगतो की, सिंहांची गर्जना हे जंगलातील सुख आणि सौभाग्याचं लक्षण आहे. मसाईच्या भूमीवर सिंह नाही याची आपण कल्पना देखील करू शकत नाही आणि अशा भूमीवर आपल्याला राहायचं नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दर्पण : समाज प्रबोधनाची नवी दृष्टी