Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाशिवरात्री पूजा विधी!

महाशिवरात्री पूजा विधी!

वेबदुनिया

WD
माघ वद्य चतुर्दशीला ‘महाशिवरात्र’ म्हणतात. (प्रत्येक महिन्यात येणार्‍या वद्य चतुर्दशीला ‘शिवरात्र’ म्हणतात.) या दिवशी भगवान श्रीशंकराच्या ज्योतिर्लिंगाचा उद्धार झाला असे म्हणतात. भगवान श्रीशंकराला आवडणारी बेलाची पाने वाहून पूजा, अभिषेक करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करतात.

माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्‍त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी काताचा संकल्प करावा. सायंकाळी शास्त्रोक्‍त स्नान करावे. भस्म व रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचारे पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावी. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ व मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वत:च्या मस्तकावर ठेवावे क्षमायाचना करावी. चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात. त्यांना `यामपूजा' म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, धोत्रा, आंबा व बेल यांची पत्री वहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावे. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. (पारणे चतुर्दशी संपण्यापूर्वीच करणे योग्य असते.) ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्‍ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे कात केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

सोरटी सोमनाथ, श्रीशैल, महाकालेश्र्वर, ओंकार मांधाता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्र्वर, औंढ्या नागनाथ, काशी विश्र्वनाथ, त्र्यंबकेश्र्वर, केदारनाथ आणि घृष्णेश्र्वर अशी १२ ज्योतिर्लिंगे भारतात आहेत. त्यांपैकी परळी-वैजनाथ (बीड), औंढ्या नागनाथ (हिंगोली), त्र्यंबकेश्र्वर (नाशिक), भीमाशंकर (पुणे) व घृष्णेश्र्वर (औरंगाबाद) ही महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगे आहेत. शंकराची आद्यस्थाने म्हणून ही तीर्थक्षेत्रे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावातील शंकराच्या मंदिरात महाशिवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो. ५ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी विशेष उत्सवासाठी लाखो भाविक जमतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi