आता तर गांधी विचारांचीच हत्या
गांधीजींच्या हत्येला इंग्रजी वर्तमानपत्रांनी 'एसासिनेशन' असे संबोधले होते. याचा अर्थ विश्वासघाताने केलेला खून. एका वृत्तपत्राने लिहिले होते, की चुका आम्ही केल्या, पण शिक्षा मात्र गांधीजींना मिळाली. पण दुर्देवाने गांधीजींच्या हत्येला 'वध' असे म्हटले जाते. मी या शब्दावर आक्षेप घेतला, त्यावेळी माझ्यापुढे शब्दकोश धरण्यात आला. त्यात खून, हत्या आणि वध हे समानार्थी शब्द होते. पण हे तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत. त्यांच्या छटा वेगळ्या आहेत. पण शब्दकोशात केवळ प्रतिशब्द मिळतात. त्यांचे अर्थ सापडत नाहीत हेच आपण विसरतो. शब्दाचा अर्थ तो सार्वजनिक जीवनात कोणत्या भावनेतून उपयोगात आणला जातो त्यावर अवलंबून असतो. वध हा शब्द राक्षसांना मारण्याच्या संदर्भात वापरला जातो आणि ते धर्मकृत्य मानले जाते. हे कृत्य करणार्याला धर्मात्मा संबोधले जाते. पण प्रभू रामचंद्रांनी रावणाची हत्या केली असे म्हटल्यास समाज स्वीकारणार नाही. त्याविरूद्ध आंदोलने केली जातील. पण गांधीजींच्या हत्येसाठी वध शब्दाचा जाणीवपूर्वक वापर केला जात आहे. जणू काही ते धर्मकृत्य होते आणि गोडसे धर्मात्मा होता. आज इतर शहिदांसोबत गांधीजींनाही श्रद्धांजली अर्पण केली जाईल. शासकीय आदेशानुसार कर्मकांडाप्रमाणे त्यांच्या समाधीवर निर्विकल्प आणि निर्विकार भावनेने फुले अर्पण केली जातील. गांधीजींची राजघाटावर समाधी आहे. त्यासंदर्भात एका हिंदी कवीची कविता उल्लेखनीय आहे. तो म्हणतो, यह शव जिस पर मैंनेफूल चढाएँ हैवह कत्ल भी मेरे हीइशारे पर हुआ हैआता तर गांधीजींचे चित्र नोटांवर छापले आहे. नोटांवरच्या त्यांच्या दर्शनालाच गांधी दर्शन असे म्हटले जाते. गांधीजींचे चित्र आता सरकारी कार्यालयांच्या भिंतीवरही लावण्यात आले आहे. त्यामुळे गांधी दर्शन घेऊन भ्रष्टाचार करण्यासाठी कर्मचारी मोकळे झाले. आता गांधीजींची नोट केवळ विनिमयाचे साधन उरलेले नाही तर माणसे आणि मते खरेदी करण्याचेही ते साधन झाले आहे. खून करण्यासाठी आणि सुपारी करण्यासाठीही याच नोटांचा वापर केला जात आहे. जॉर्ज बर्नाड शॉने म्हटले होते, की खून हा सेन्सॉरशिप लादण्याचा शेवटचा आणि सगळ्यांत चांगला मार्ग आहे. आणि आता लोकांचा हिंसाचारावर विश्वासही वाढत चालला आहे. म्हणून गोडसे ही एक व्यक्ती नव्हे, तर प्रवृत्ती आहे. गांधीजींची हत्या होण्यापूर्वी त्यांच्या हत्येचे तीन प्रयत्न झाले होते. शेवटी प्रार्थनास्थळाकडे जाताना त्यांना नमस्कार करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गांधीजींनी शेवटपर्यंत पाकिस्तानला व पाकिस्तानच्या वृतीला विरोध केला होता. पण तरीही धर्मांध शक्तींनी त्यांनाच गुन्हेगार ठरविले. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही, दोन धर्मांचे लोक एकत्र राहू शकत नाही, हे गांधीजींना मान्य नव्हते. पण त्यांच्या हत्येनंतर आपण मात्र हे मान्य केले आहे. कारण दोन वेगळ्या भाषा बोलणारेही एकत्र राहू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच भाषावर प्रांतरचना नंतर करण्यात आली. परिणामी भारताचे आणखी तुकडे झाले. उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड ही राज्ये अस्तित्वात आली. आता त दक्षिण व उत्तर भारतही एकत्र नांदण्यास तयार नाहीत. ही दुर्देवाची बाब आहे.