Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोरलुट कौतुक सोहळा, बोरन्हाण करण्यामागील शास्त्र

webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (12:51 IST)
मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण घातले जातात. मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य आहे. पण काही जण हे रथ सप्तमी पर्यंत करतात. वयोगट 1 वर्षांच्या मुलानं पासून वयोगट 5 वर्षांचे मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो.
 
बोरन्हाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात, व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या, असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जाते. त्यांनी बाळास अंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. ह्यालाच बोरन्हाण असे म्हणतात.
 
एरवी शुभकार्यात वर्ज्य असणारा काळा रंग दिमाखात मिरवायला मिळणारा हा सण आहे. तो प्रकार तान्ह्या बाळाच्या बाबतीतही आहे. त्यात ते बाळ जर बसू लागले असेल तर येणारी मजा काही औरच. त्याला हलव्याचे गळ्यातले हार, बाजुबंद, हातातले तसेच हलव्याचा मुकुट, बासरी आदी पांढर्‍याशुभ्र रंगबिरंगी हलव्यानी बनवून सजवले जाते. अंगात काळा अंगरखा, झबलं अंगावर हलव्याचा साज अशा वेषात सजलेली बाळं खरंच बाळकृष्णच दिसतात. त्या बालकृष्णाला मध्यभागी चौरंगावर बसवले जाते. त्याच्या आजूबाजूला इतर लहान मुलांना बसवले जाते. त्या मुलाच्या डोक्यावरून लाह्या, चुरमुरे, बोरं चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे इत्यादी पदार्थांची ओंजळ ओतली जाते. 5 जणी, 11 जणी मिळून त्यावर हा वर्षाव करतात. त्यालाच बोरन्हाण म्हणायची प्रथा आहे. याला काही भागात बोरलुट असेही म्हणतात.
 
यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे. अन् त्या त्या ऋतुत येणार्‍या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लावणाचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हाण ही त्याचीच प्रतीक आहेत.
 
बाळावर असाच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे. ह्या भावनेने केलेला हा एक संस्कारच होय.
 
बोरन्हाण कां करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नांवाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्या नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरन्हाण केले जाते.
 
लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहानं मुलांवर बोरन्हाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण या मागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

मकर संक्राती: तीळ स्नान केल्याने खुलेल रूप, राहाल निरोगी