महाराष्ट्रात मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व खूप आहे. या दिवशी कटू संबंध सुधारण्याची संधी मिळते. कळत नकळत कुणाला कटू बोलले गेल्यास त्याची माफी मागून संबंध पूर्ववत करता येतात. त्यासाठीच 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' असे म्हणून एकमेकांना तीळ-गूळ देतात. स्त्रिया हळदी कुंकवाच्या निमित्ताने गव्हाच्या ओंब्या, गाजर, ऊस, यांचे तुकडे, शेंगा, हरबरे, हलवा हे पदार्थ लहान मडक्यांना हळद लावून त्यात हे पदार्थ घालून ते सुवासिनींना देतात. त्याचप्रमाणे संक्रांतीत काळी वस्त्र घालण्याचीही महाराष्ट्रात प्रथा आहे.
संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' केले जाते. यावेळी मुलांना हलव्याचे दागिने व काळे कपडे घातले जातात. कुरमुरे, बोरं, तिळाच्या रेवड्या, या पदार्थांचा मुलांवर अभिषेक केला जातो. लहान मुलं हा खाऊ आवडीने गोळा करतात.
तिळाच्या लाडूत सोने ठेवून देण्याची प्रथा गुप्तदानाचे माहात्म्य दर्शविते. तिळाच्या लाडूतील तूप आरोग्यासाठी पोषक असते. या सणात तिळाच्या लाडूला जे महत्त्व प्राप्त झाले आहे त्याला एक नैसर्गिक कारण आहे. निसर्ग आपल्याला ऋतूनुसार फळे व वनस्पती देतात. थंडीच्या दिवसात रक्ताभिसरणांची गती मंदावण्याची शक्यता असते. अशा वेळी शरीराला स्निग्ध पदार्थांची गरज असते व तिळात स्निग्धता हा गुण असतो. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूत पौष्टिक पदार्थांची आवश्यकता पूर्ण करतो.
या दिवशी पतंग उडविण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडविण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी ज्या प्रकारे आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांची पतंग उडताना दिसतात त्याचप्रकारे या विश्वाच्या विशाल आकाशात सत्ताधीश, धनवान, विद्वान अशा अनेक प्रकारचे पतंग उडतात. पतंगाची दोरी जोपर्यंत सूत्रधाराच्या हातात असते तोपर्यंतच ते अभिमानाने उडत राहते. सूत्रधाराच्या हातातून सुटलेले पतंग झाडावर, विजेच्या तारेवर किंवा पंख्यावर अडकतात. भगवंताच्या हातातून सुटलेला मानवरूपी पतंगदेखील थोड्याच काळात रंग उडालेला व फिकाच दिसतो.
थोडक्यात या पर्वानिमित्त सूर्याचा प्रकाश, तिळगुळाची स्निग्धता व गोडवा आणि पतंगाचा त्याच्या सूत्रधाराप्रती विश्वास आपल्याही जीवनात साकारू.