अमळनेर (जि. जळगाव, महाराष्ट्र)
येथील श्री मंगळग्रह मंदिरातर्फे नवनवीन उपक्रम नेहमी राबविले जात असतात. यात निसर्गाशी जोडणारा एक उपक्रम म्हणजे संत सखाराम महाराज रोपवाटिका (नर्सरी).
गेल्या वीस वर्षापासून मंगळग्रह मंदिरातर्फे या रोपवाटीकेचे संगोपन केले जात आहे. यात विविध रंगाच्या फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली असून नर्सरी नेहमी फुलांनी बहरलेली असते. यामुळे येथे येणारे भाविकांची मने नेहमी प्रसन्न राहत असतात.
श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या येथील नर्सरीत विविध प्रकारच्या रोपांची कलमे बनविण्यात आली आहेत. यात गुलाब, कणेर, जाखंद, मोगरा, चमेली जाई जुई, शेवंती, टगर, चांदणी, बोगनवेल, चाफा, वाटरलिली, या सह मोठ्या होणाऱ्या रोपांमध्ये वड, उंबर, पिंपळ, बुश, टोपीएका, निंब, जांभूळ, नारळ, आंबा, गुलमोहर सह अनेक रोपे आहेत. तर शोच्या रोपांमध्ये स्नेक प्लांट, गंध तुळशी, कांचन, बावा अशी विविध प्रकारच्या रोपांची कलमे देखील तयार केली जात असतात. येथील नर्सरीत गार्डन कटिंग करून कलमे काढली जातात. हि कलमे छोट्या बॅग मध्ये खत मिश्रित मातीमध्ये जगविले जातात.
मंदिरातील नर्सरीत सध्या पंधरा हजारावर रोपे संगोपित करण्यात आली आहे. अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात यावेळी येथील नर्सरीत भाविक गेल्याशिवाय राहत नाही. येथील बहरलेल्या रोपवाटिकेमुळे भाविकांचे मन देखील प्रसन्न होत असते.