जळगाव : मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील त्यामुळे तो मांडणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (सोमवारी) जळगाव येथील सभेत केला.
प्रकाश आंबेडकर यांची गाडगेबाबा चौकात जाहीर सभा झाली. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय मांडणार नाही. नवा सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचा मुद्दा यशस्वीपणे हाताळला. पण त्यानंतरही तत्कालीन सरकारने कुंभकोणी यांना पुढे काम करू दिले नाही. त्यांना या खटल्यात लक्ष घालू नका, हजर राहू नका असे आदेश देण्यात आले. असे का? गिरीश महाजन यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विधिमंडळ अधिवेशनावर निशाणा साधताना हा लोकशाहीतील तमाशा असल्याचा आरोप केला. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याचे वाटत नाही. तिथे सत्ताधारी कोण अन् विरोधक कोण हेच समजत नाही. असा लोकशाहीचा तमाशा तिथे सुरू आहे. राज्यापुढे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. पीकविम्याच्या मुद्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी मोदी देशासाठी धोकादायक असल्याचाही आरोप केला. व्यक्ती म्हणून विचार केला तर नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक आहेत. मोहन भागवत व नरेंद्र मोदी वर्षभरात एकमेकांना किती वेळा भेटले हे भागवत यांनी स्पष्ट करावे. मोदी आरएसएसच्या जोरावर प्रथम मुख्यमंत्री व पंतप्रधान झाले. पण आता ते याच संघटनेचे तीनतेरा वाजवण्याचे काम करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.