Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरेंचा सरकारला इशाराः लोकांच्या केसाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन

uddhav thackeray
, शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (22:05 IST)
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं होतं. पण आम्ही कधीच आंदोलकांना लाठीमार केला नव्हता. सध्याचं सरकार हे निर्घृण सरकार आहे. तुम्ही कुणावर गोळ्या चालवत आहात. लोकांच्या केसाला धक्का जरी लागला तरी अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
 
ठाकरे यांनी आज जालना येथील अंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.
 
"गणेशोत्सवात संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे, त्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले, "एक फुल दोन हाफ सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार होता. त्याच्यासमोर ही अडगळ नको, म्हणून ते तुम्हाला जबरदस्तीने उठवायला निघाले होते."
 
शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार
उद्या (3 सप्टेंबर) बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असणार आहेत.
 
मात्र, सकल मराठा समाजाच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. त्यासोबतच बुलढाणा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यात जालना येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यामुळं बुलढाण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
बुलडाणा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात एक लाख लाभार्थ्यांना मदतीचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना 17 कोटींची मदत केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
 
शरद पवारांचा आरोप, 'मुंबईवरून आदेश आल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर'
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शरद पवार आणि उदयनराजे घटनास्थळी पोहोचले.
 
शुक्रवारी (1 सप्टेंबर) रोजी मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर जोरदार लाठीमार केला. यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी दोघेही जखमी झाले आहेत.
 
सदर घटनेचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.तसंच, राजकीय पक्षांकडूनही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतं.
 
अंतरवाली सराटी गावात पोहोचल्यानंतर शरद पवार यांनी पोलिसांच्या लाठीमाराचा तीव्र शब्दांत निषेध केला
 
यावेळी शरद पवार आणि उदयनराजे एकाच मंचावर दिसले.
 
“आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं. जखमींच्या उपचाराची जबाबदारी सरकारने घ्यावी. घडलेल्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी,” असं उदयनराजे म्हणाले
 
मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत आहे. आधीच आरक्षणाची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे होती. आता मुख्यमंत्र्यांनी आंदोलंकाशी चर्चा करावी आणि योग्य मार्ग काढण्याची मागणी त्यांनी केली.
 
उदयनराजे यांनी लाठीहल्ल्याचा निषेध केला असला तरी यापुढे शांततेत आंदोलन करावं असं आवाहनही केलं आहे.
 
जालन्यात घडलेली घटना गंभीर आहे. मुंबईवरून आदेश आल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर शरद पवार येथे दाखल झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
 
ते म्हणाले, “जालन्यात सरकारकडून बळाचा गैरवापर करण्यात आला आहे. निष्पाप नागरिकांना चुकीची वागणूक देण्यात आली. लहान मुले, महिला यांना न पाहता लाठीमार केला गेला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन लवकर तोडगा काढावा.”
 
दगडफेक-जाळपोळीचे प्रकार
अंतरवली येथे काल (1 सप्टेंबर) घडलेल्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र काही भागांतून दगडफेक जाळपोळीचे प्रकार समोर येत आहेत.
जालन्यातल्या अंबड चौफुली इथे आज दुपारी आंदोलकांनी दगडफेक केली. काही गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.
 
रस्त्यावर दगडांचा खच साचलेला दिसत आहे. जाळपोळ झालेल्या गाड्या विझवण्याचे काम अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.
 
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड फोडल्या आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
मराठा आंदोलकांवरील लाठीमार हा शासकीय अत्याचार - उद्धव ठाकरे
मराठा आंदोलकांवरील लाठीमार हा शासकीय अत्याचार आहे, अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसंच आपण शनिवारी संध्याकाळी जालना दौऱ्यावर जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले, “राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती दिली जाते, या 'दोन फुल एक हाफला' आंदोलनाची कल्पना नव्हती का? बारसूत लाठीमार केला तेव्हा मी तिथे गेलो होतो, त्यानंतर वारकऱ्यांवर लाठीमार झाला, आता जालन्यात झाला, पण अजूनही त्यांची चौकशीच सुरू आहे.”
 
“ज्या पोलिसांनी करोना काळात जीवाचे बाजी लावून काम केलं ते सरकार बदलल्यावर राक्षस होऊ शकतो. कारण, त्यांना कुणी तरी आदेश देणारा आहे, असंही ठाकरे म्हणाले.
 
“मराठा आरक्षण आणि धनगर , ओबीसी, समाज याच्या आरक्षणावर निर्णय घ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात निर्णय घ्या. दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत तुम्ही लगेच कायदा आणता. तसा केंद्रानं मराठा आरक्षण आणि धनगर, ओबीसी समाज यांच्या आरक्षणावर निर्णय घ्यावा,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
 
रोहित पवार उपोषणकर्ते मनोज जरांगेंच्या घरी
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार झालेल्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना भेटी दिल्या. याबाबत रोहित पवारांनी सोशल मीडियावरून माहिती दिली.
 
रोहित पवार यांनी या भेटीनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, "उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.या ठिकाणी नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाणवले.
 
रोहित पवारांनी पुढे सांगितलं की, "पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत ते बघितले नाही. वयोवृद्ध नागरिकांना आणि लहान मुलांनादेखील मारहाण करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला.
 
"छरे लागलेल्या युवकांच्या जखमा बघून आपल्याच नागरिकांवर अशाप्रकारे छरयांचा वापर करता येतो का, हा प्रश्न पडतो. पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडले असल्याची तसेच वरिष्ठांच्या आदेशानेच पोलिसांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याची भावना अनेक युवकांनी व्यक्त केली. या सर्व युवकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शासनाने देखील घटनेकडे गांभीर्याने बघायला हवे."
 
नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते. आंदोलकांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.
 
या दरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला.
 
तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
 
या प्रकरणात पोलिसांची बाजू नेमकी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांच्या बाजूने प्रतिक्रिया आल्यानंतर या बातमीत अपडेट करण्यात येईल.
राजकीय नेत्यांकडून निषेध
मराठा आरक्षणाबाबत सातत्याने भूमिका मांडणारे संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत ट्विट करून निषेध व्यक्त केला.
 
ते म्हणाले, “अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.
 
मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
 
दरम्यान, या प्रकरणावर मंत्री शंभुराज देसाई यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला याबाबत प्रतिक्रिया दिली.
 
ते म्हणाले, “ही घटना खरंच योग्य नाही. परंतु, मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीमार करण्याची वेळ का आली, याची माहिती घेण्यात येत आहे. हे सरकार मराठा सरकारच्याच बाजूने उभे आहे. आपण त्यासाठी न्यायालयात लढा देत आहोत.
 
“पण न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता मराठा समाजाला विविध प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. केवळ गैरसमजातून आंदोलनकर्त्यांनी किंवा कुणीही प्रक्षुब्ध होण्याचं कृत्य करू नये. स्थानिकांचं काही म्हणणं असेल, तर मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीच्या चर्चेतून मार्ग काढण्यात येईल. मराठा बांधवांनी संयम बाळगावं. कुणीही कायदा हातात घेऊ नये,” असं आवाहन देसाई यांनी केलं.
 
घटनेची उच्चस्तरीय चौकशी - एकनाथ शिंदे
जालन्यातील लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
 
ते म्हणाले, "झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून मी माहिती घेतली. मनोज जरांगे पाटील या उपोषणकर्त्यासोबत मी स्वतः परवा बोललो होतो. त्यांची जी भूमिका होती, त्याबाबत मी संबंधितांना सूचना दिल्या होत्या. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा याबाबत वारंवार बैठक घेत आहेत.
 
मी मनोजची तब्येत बिघडत चालल्याने त्याला उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या मागणीवर काम सुरू आहे, असं त्याला सांगितलं. मला मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती खालावलेली असल्याने मनोजला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आज पोलीस गेले असताना हा प्रकार घडला आहे. मात्र, झालेला प्रकार दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असंही शिंदे यांनी म्हटलं.
 





Published By- Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण : शरद पवारांचा आरोप, 'मुंबईवरून आदेश आल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर'