Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 6 March 2025
webdunia

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना विरोध का होतोय?

sharad panwar
, सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (09:07 IST)
युवा संघर्ष यात्रेच्या सुरुवातीचा कार्यक्रम संपवून पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरातून निघालेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अगदी काही अंतर गेल्यावर अडवला गेला.इथे पवारांना काळे झेंडे दाखवले गेले. हा मोर्चा अडवणारे आंदोलक होते मराठा समाजातील कार्यकर्ते. पवारांविरोधात मराठा समाजातील कार्यकर्ते आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ असावी.
 
एकीकडे शरद पवारांना विरोध होतोय, तर दुसरीकडे सत्तेत गेलेल्या आणि पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या अजित पवार यांना तसंच पवारांची साथ देणाऱ्या आणि त्यांचा राजकीय वारस म्हणवणाऱ्या रोहित पवारांनाही या आंदोलनाची झळ सोसावी लागत आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोलापूर दौऱ्यावर असताना माढ्यात आणि सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्रमात बारामतीमध्ये काळे झेंडे दाखवले गेले
 
रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पुढे जाऊ देणार नाही अशी घोषणा मराठा समाजाकडून करत त्यांची यात्रा स्थगित करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ही यात्रा रद्दही करण्यात आली.
 
पवारांना होणाऱ्या या विरोधाचे कारण काय ?
मराठा क्रांती मोर्चा सुरु होता तेव्हा बापू गायकवाडांचे वडील वारले. पण आरक्षणाचा लढा मोठा महत्वाचा म्हणून सोलापूर जिल्ह्यातले सोमनाथ उर्फ बापू गायकवाड सुतकातलं घर सोडून सोलापुरच्या मोर्च्यात गेले.
 
पुढे मुंबईच्या मोर्चात गेले.
 
एक्स सर्व्हिसमन असलेल्या गायकवाडांना अपेक्षा होती की या मोर्चातून पदरात काही पडेल. पण मोर्चे संपले आणि झोळी रिकामी राहिली, असं ते सांगतात. याच उद्रेकातून गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नेत्यांना विरोध करायचं ठरवलं आणि माढ्यातल्या कार्यक्रमात अजित पवारांच्या विरोधात काळे झेंडे फडकवले.
 
बीबीसी मराठीशी बोलताना गायकवाड म्हणाले, “सगळ्यात जास्त काळ त्यांनी सत्ता भोगली आहे. पण आम्हांला मात्र काही मिळालं नाही. आरक्षणासाठी समाजासाठी काही केलं नाही. त्यामुळे आम्ही ठरवलं की विरोध करायचा आणि म्हणून काळे झेंडे फडकवले.”
 
पण पवारांच्या विरोधातलं हे नरेटिव्ह आज तयार झालेलं नाही.
 
मराठा आरक्षण मोर्चात अग्रभागी असणारे आणि आक्रमक असणारे एक नेते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "23 मार्च 1994 ला जीआर निघाला आणि ओबीसींचं आरक्षण 10 वरुन 19 टक्क्यांवर गेलं. व्हिजेएनटी मध्ये बदल झाले.
 
हे पवारांनी केलं असा प्रचार गेले काही वर्ष सातत्याने काही मराठा नेते करत आहेत. आणि तो पसरल्यामुळे पवारांच्या विरोधातला रोष वाढत गेला आहे.”
 
आरक्षणाबाबत पवारांची भूमिका नक्की काय?
खरंतर आरक्षण प्रश्नी शरद पवार कायम स्पष्ट पण वेगवेगळ्या भुमिका मांडत आले आहेत.
 
2018 मध्ये पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगावी लागेल अशी भूमिका मांडली होती. पण पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
हे आरक्षण पुढे कोर्टात टिकलं नाही. सध्या सुरु असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार अंतरवाली सराटीला दाखल झाले होते.
 
त्यानंतर शिंदे गटाकडून या आंदोलनाच्या मागेच शरद पवार असल्याचा प्रचार करण्यात आला. पण याच अंतरवाली सराटीतल्या मोर्चात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
 
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते, " काही लोक म्हणत आहेत की ओबीसींवर अन्याय होतोय. ते बरोबर म्हणत आहेत. केंद्र सरकारने निर्णय घेत कोटा वाढवण्याची आवश्यक्ता आहे.”
 
तर जरांगेंच्या उपोषणावर पवार यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत जरांगे आणि सरकारमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. चांगला निर्णय आला तर आम्हांला आनंद आहे असं वक्यव्य केलं.
 
याविषयी विचारल्यावर एका मुलाखतीमध्ये मनोज जरांगे म्हणाले , "एकानेही प्रयत्न केले नाहीत. आमच्या बाजूने एकही जण नाही. एकही असता तर असं दारोदार फिरावं लागलं नसतं आम्हांला. यांनी मदत केली नाही म्हणून आता सामान्य लोक रस्त्यावर उतरले.”
 
हा उद्रेक अचानक का?
 
पण हा उद्रेक तयार होण्यामागची कारणे काय.?तो अचानक तयार झाला आहे का आणि यात खरंच पवार यांची मराठा स्ट्रॅागमॅन ही जी प्रतिमा तयार आहे ती त्यांनी निर्माण केलेली आहे का?
 
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सकाळचे संपादक सम्राट फडणीस म्हणाले ," शरद पवार यांनी 1978 पासून राज्यस्तरीय नेतृत्व करताना स्वतःला 'मराठा नेता' असे सादर करण्याची वाट स्विकारलेली नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर वाद असो; महिला आरक्षण असो किंवा अन्य कोणताही विषय असो पवारांनी सातत्याने सर्व जातींना सोबत घेणारे नेतृत्व असे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पवार केंद्रात प्रभावी होऊ लागले, तेव्हा त्यांच्या मागे 'मराठा स्ट्राँगमॅन' ही उपाधी चिकटली. तीदेखील प्रामुख्याने महाराष्ट्र म्हणजे मराठा अशा अर्थाने होती.”
 
त्यांनी पुढे म्हटलं की, “महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर पवारांचे वर्चस्व होते. स्थानिक, प्रादेशिक मराठा नेते या चळवळीचे नेतृत्व करत होते. चळवळीवर धोरणात्मक वर्चस्व ठेवणाऱ्या पवारांभोवती या नेत्यांचाच वावर होता. परस्परांना ते सोयीचे होते. त्यातून महाराष्ट्रातही 1999 नंतरच्या काळात पवार म्हणजे मराठा नेतृत्व ही धारणा दृढ होत गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक वाढीसाठी ही धारणा उपयोगाची असल्याने पवारांनी ती स्वतःहून नाकारली नाही. खुद्द पवारांनी आपण फक्त मराठा समाजाचे नेतृत्व करतो, असे कधीही म्हटलेले नाही. त्यांना जातीच्या मर्यादेत स्वतःला अडकवून घेणे मान्यही असणार नाही. अन्यथा, त्यांचे राजकारण इतक्या दीर्घकाळ आणि सर्वस्पर्शी टिकून राहिले नसते, हे लक्षात घ्यावे लागेल.”
 
“गेल्या दोन दशकात राजकारण, सहकार, चळवळी याद्वारे पुढे आलेल्या मराठा समाजातील नेतृत्वाला पवार हे 'मराठा समाजा'चे नेते असल्याचे मानायला सुरूवात केली. मराठा आरक्षणासाठी गेल्या सात वर्षांत झालेल्या आंदोलनावर पवार प्रतिमेचा मोठा प्रभाव दिसतो. वयाच्या विशी ते चाळिशीत असलेल्या मराठा समाजाला पवार हे मराठा नेते म्हणूनच मान्य आहेत. मग, आपला समाज म्हणून त्यांनीच हा प्रश्न सोडवला पाहिजे ही या गटाची मागणी आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर पवार यांनी एकतर्फी भूमिका घेतली पाहिजे, असा या गटाचा आग्रह राहतो. तो आग्रह पवार पूर्ण करू शकत नाहीत. त्यातून या गटाचा संताप होतो आणि त्याची परिणती पवारांना आंदोलनस्थळी विरोध करण्यापासून ते त्यांच्याविरोधातच आंदोलनापर्यंत होते आहे," असं सम्राट फडणीस यांनी म्हटलं.
 
'... म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पवार हे टार्गेट'
या विरोधामागचं कारण स्पष्ट करताना मराठा नेते प्रवीण गायकवाड म्हणाले, "शरद पवार सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री होते. मराठा महासंघ पुर्वीपासून पवारांमुळे आरक्षण मिळाले नाही असं म्हणतात. पण आता होत असलेला विरोध हा पवारांना नसून लोकप्रतिनिधींना आहे.
 
सत्ताधारी किंवा विरोधक आमच्या भावना पोहोचवत नाहीत म्हणून लोकप्रतिनिधींविरोधातील जनमत आहे. आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस- राष्ट्रवादी सत्तेत होते आणि त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पवार हे टार्गेट होत राहिले आहेत.”
 
तर राजेंद्र कोंढरे म्हणाले, “मराठवाड्यातील आंदोलने उग्र होतात त्याचं कारण म्हणजे मराठवाड्यात आर्थिकदृष्ट्या विकास कमी झालेला आहे. शैक्षणिक विकास कमी आणि बेरोजगारीचे प्रमाण जास्त राहिले आहे. त्याचा परिणाम म्हणून आरक्षण हा एकमेव मार्ग वाटतो.
 
पश्चिम महाराष्ट्रात साखर आणि सहकार उद्योगाच्या माध्यमातून मराठा नेत्यांची पकड राजकारणावर आणि समाजकारणावर राहिली आहे. एका भागात किमान 3 मराठा नेत्यांची ताकद आणि पकड असते. मराठवाड्यातून सुरु झालेलं आंदोलन आणि लोकांच्या हातातलं आंदोलन याचा परिणाम म्हणून हा विरोध होत आहे.”
 
‘शरद पवारांचे नेतृत्व संपवण्यासाठी भाजप विरोधातील नेतृत्व संपवले जातंय’
राजकीय विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार यांच्या मते मात्र मराठा कायम विभागलेले राहीले.
 
बीबीसी मराठीशी बोलताना पवार म्हणाले, "1991पासून मराठ्यांचे चार भाग पडले आणि ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत गेले. त्यामुळे पवारांसोबत तसे 25 टक्केच मराठे होते. पवारांनी हाती घेतलेले ऐरणीचे प्रश्न लक्षात घेतले तर नामांतर, आघाडी, महिला आरक्षण असे प्रश्न त्यांच्या दृष्टीने आघाडीवर होते. महाराष्ट्रात राजकारण करणारे बहुतांश लोक हे पवारांसोबत होते. यातले अनेक जण भाजप सोबत गेले. त्यानंतर पडलेलं अंतर यातून दिसत आहे.”
 
“देवेंद्र फडणवीस यांना कायम पवारांचे नेतृत्व संपले तर आपल्याला म्हणजे भाजपला राजकीय स्पेस मिळेल असं वाटत आले आहे. त्यामुळे त्याचं प्रतिबिंब सध्या सोशल मिडियावर होणाऱ्या पवार विरोधात दिसत आहे. तसंच सध्या शरद पवार यांची ताकद कमी झालेली आहे. आत्ता विरोध करता येणं शक्य झालं आहे. रोहीत पवार नवे नेते तर अजित पवार भाजप मध्ये गेले आहेत. शरद पवारांचे नेतृत्व संपवण्यासाठी भाजप विरोधातील नेतृत्व संपवले जात आहे. ताकद संपली हे लोकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. मराठा नेतृत्व सहसा मध्यममार्गी असतं. ते टोकाला जात नाहीत. सध्याचे लोक टोकाला जात आहेत. इतिहास रिपीट होत आहे,” असं त्यांनी म्हटलं.
 
प्राध्यापक आणि राजकीय अभ्यासक श्रीरंजन आवटे यांच्या मते मराठा बहुल असलेल्या महाराष्ट्रात या समुहासोबत कसं डील करावं याचा प्रश्न सर्वच पवार कुटुंबीयांसमोर होता.
 
ते म्हणतात, "याचं ठोस उत्तर देता आलं नाही. शरद पवार यांची प्रतिमा मराठा स्ट्राँग मॅन अशा प्रकारची राहिली. प्रत्यक्षात यातून आकाराला आलेलं मराठा सरंजामी राजकारण हे काही मोजक्या मराठा सरंजामदारांपुरतं मर्यादित राहीलं.
 
स्वाभाविकच मराठा समुदायाला पवारांनी आपल्या करता काही केलं आहे असं वाटलं नाही. प्रत्यक्षात पवारांचे काम हे जातीच्या पलिकडेही खूप होतं. आता बेरोजगारी, आणि शेतीवरही अवलंबून राहता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मराठ्यांमधली आर्थिक आणि सांस्कृतीक चिंता ही समोर आली आहे. त्यामुळे त्याचा फटका आता पवार कुटुंबीयांना बसतो आहे.”
 
पण याचा पवारांच्या राजकारणावर काही परिणाम होईल का?
याबाबत बोलताना श्रीरंजन आवटे म्हणाले ,"आत्ताच्या सरकारला हे आंदोलन हाताळता येत नाहीये असं दिसतंय. पण सरकारला मात्र त्याचा फटका बसेल असं दिसत आहे. पवारही पुरेसे गोंधळलेले दिसत आहेत मराठा आरक्षणाबाबत. कसं डिल करावं असं दिसत नाही. त्यात एकीकडे त्यांची ठोस भूमिका नाही आणि दुसरीकडे मोठी व्होट बॅंक दिसते आहे. यालाच पवारांची मुत्सद्देगिरी म्हटले जाते.”
 
प्रकाश पवार यांच्या मते मात्र पवारांना याचा फायदा होईल.
 
पवार म्हणाले, "पवारांच्या राजकारणावर सध्या परिणाम झालेला आहे. पण जेवढी टिका होईल तेवढं ते उभारून वर येतील. त्यांना होत असलेल्या विरोधाने ओबीसी आणि मराठ्यांच्या मनात घर केलं तर शरद पवार नव्याने जागा निवडून आणू शकतील. अगदी 25 टक्के जरी मतदान सरकलं तरी फायदा होईल.”
 
राजेंद्र कोंढरे यांच्या मते आंदोलन समाजाने, लोकांनी हातात घेतल्याने ते कोणत्या दिशेने जाईल ते सांगता येणे अवघड आहे. कोंढरे म्हणतात आंदोलन कुठे जाईल त्याचा परिणाम कोणावर होईल ते सांगता येत नाही. पण यात राजकीय बळी मात्र नक्की कोणाचा तरी जाणार आहे.
 
 














Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत महापे येथे स्थापित