Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमच्यावर अन्याय बहुजन संघटना

Maratha Aarakshan
माराठा समाजच्या निघत असलेल्या मोर्चे आणि त्यात ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी होत असताना आता ओबीसी य्कात्र येत आहेत असे चित्र आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे असा सरळ आरोप करत नाशिकमध्ये बहुजन समाजाचा मोर्चे निघाला आहे. आवेळी जिल्हधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. 
 
निवेदन खालील प्रमाणे 
 
प्रति ,
मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब 
मुख्यमंत्री 
महाराष्ट्र राज्य, मुंबई 
(मार्फत मा.जिल्हाधिकारी,नाशिक)
 
         विषय : बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व व विकास पुरुष मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब  
                    आणि भुजबळ कुटुंबियांवरील अन्यायाबाबत...
 
मा.महोदय,
          महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम बहुजन, ओबीसी, दलित,आदिवासी,भटके-विमुक्त,अल्पसंख्यांक आणि कोट्यावधी शोषित-पिडीत व वंचितांचे आशास्थान असलेल्या मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब यांचा दि १५ सप्टेंबर २०१६ रोजी ७०वा वाढदिवस असल्यामुळे आम्हा लाखो समर्थकांच्या वतीने त्यांना अनंत-अनंत शुभेच्छा !
          मुंबई महानगरपालिकेचे महापौर, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते व दोन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री अशा चढत्या आलेखाद्वारे ४० वर्ष नेतृत्व व कार्यकर्तृत्वाचा परिचय म्हणजेच मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब ! ते बहुजन व इतर मागासवर्गीयांचे देशस्तरावरील नेते असल्याचे महाराष्ट्रासह देशाची राजधानी दिल्ली , बिहार, हरियाणा , उत्तराखंड ,  उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड , आंध्रप्रदेश , गुजरात, गोवा, इत्यादी राज्यांमधील भव्य मेळाव्यांवरून स्पष्ट झालेले आहे. राजकीय वाटचालीमध्ये यशाचा आलेख जसा-जसा उंचावत जातो तस-तसा गुप्त शत्रूंच्या कारवायांचा त्रास सुरु होतो. भुजबळसाहेब सुद्धा त्याला अपवाद राहिले नाहीत. त्यांच्या मागे सुद्धा राजकीय विरोधक आणि व्यावसायिक मतभेद असलेल्या काही स्वार्थी मंडळींनी विविध आरोपांचे शुक्लकाष्ट लावलेले आहेत.
आमच्या या कार्यक्षम नेत्यावर काही हितशत्रुंनी वैयक्तिक आकस,मत्सर व राजकीय वैमनस्यातून  त्यांच्या  विरोधात दिशाभूल करुन, खोटी-नाटी कपट कारस्थाने करून बनावट व खोटे साक्षीदार उभे करून तपास यंत्रणांना चुकीची माहिती पुरविली आहे. ही सर्व माहिती धादांत खोटी असून कायद्याच्या चौकटीवर ती कधीच खरी ठरणार नाही याचा आम्हां सर्व समर्थकांना  ठाम विश्वास आहे.
तसेच गेले काही दिवस त्यांचेविरुद्ध पद्धतशीर राजकीय कट केल्याची व त्याद्वारे त्यांचे दमन व  चरित्रहनन करण्याची नियोजनबद्ध साखळी व प्रयत्न झाल्याची आम्हा तमाम समर्थकांची भावना आहे.
त्यांचे कामाचेबाबत अथवा तथाकथित भ्रष्टाचाराबद्दल कोणतीही तक्रार नसतांना जाणीवपूर्वक पूर्वग्रहदुषित नियोजनाचा भाग म्हणून मा.उच्च न्यायालयात विशिष्ट व्यक्तिंमार्फत रिट पिटीशन्स  दाखल केल्या गेल्या. त्याद्वारे वस्तुस्थितीची तोडमोड करुन अवास्तव आकडे मांडून तपासाचे आदेश घेतले गेले. विशिष्ट राजकीय नेत्याने केलेल्या वल्गनेनुसार घटनाक्रम घडवून आणून गुन्हे दाखल करण्यात येऊन  आरोपपत्र दाखल केले गेले. तक्रारदारांनी लिहिलेल्या पूर्वनियोजित पटकथेनुसार तपास यंत्रणा काम करतांना दिसतात त्यामुळे यंत्रणांबाबत शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे. भुजबळ परिवाराकडून  चौकशीला संपूर्ण सहकार्य केले जात असतांना सुद्धा मा.श्री.छगनराव भुजबळ व मा.श्री.समीरभाऊ भुजबळ यांना चौकशीच्या नावाखाली बोलवून अटक केली आहे.
वास्तविक पाहता आमच्या समजुतीनुसार आरोप केलेले प्रकरणे जसे कलिना भूखंड व  महाराष्ट्र सदन बांधकाम यामध्ये शासनाचे वतीने फक्त एफ.एस.आय. वापरण्याचे शासनाचे धोरण होते. आजही सदरील एफ.एस.आय. संबंधित बिल्डर्सला शासनाने दिलेला  नाही व शासनाचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. मात्र एफ.एस.आय. ऐवजी जणू काही भूखंड गिळंकृत केले गेले अशा वल्गना केल्याचे दिसते. संबंधित निर्णयापूर्वी शासनाच्या  विविध विभागांमधील प्रधान सचिवांकडून छाननी , समिक्षा  व मुल्यांकन झाल्यावर मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने निर्णय घेतलेले असतांना एकटया भुजबळ साहेबांना दोषी धरणे न्यायोचित  वाटत नाही.
          तक्रारदारांद्वारे सतत अतिशोक्तिपूर्ण विधाने  करून शासकीय यंत्रणांवर दबाव निर्माण करून त्याद्वारे हितशत्रुंचा गैरहेतू साध्य केला जात आहे. खोटी,अवास्तव व बिनबुडाची माहिती जनतेसमोर आणून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे तसेच भुजबळ परिवाराची नाहक बदनामी करण्याचा डाव सुरु आहे.
भुजबळ कुटुंबियांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. चौकशी यंत्रणाना वेळोवेळी सहकार्य केले जात असतांनाही विशिष्ट यंत्रणाकडून केवळ सूडबुद्धीने  चौकशीचा अतिरेक होतांना दिसत आहे. एकंदरीत कार्यपद्धती पहाता जाणीवपूर्वक श्री.भुजबळ साहेब व त्यांच्या  कुटुंबियांना लक्ष करुन राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न दिसतो.
 
गेल्या सहा महिन्यांपासून भुजबळ साहेबांच्या जामिनासाठी न्यायालयीन लढा सुरु आहे. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जामीन देण्याची पद्धत असल्याचे कळते मात्र यंत्रणांच्यावतीने वेळ साधून नवीन आरोप व चौकशा सुरु करुन डांबून ठेवण्याचे धोरण कायद्याच्या राज्यात योग्य वाटत नाही. त्यांची संपूर्ण राजकीय व सामाजिक कारकीर्द संपविण्यासाठी षडयंत्र आखले जात आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यामुळे मूक मोर्चा ही अन्यायाच्या विरुद्धची स्वाभाविक  प्रतिक्रिया आहे.
 
तपासी यंत्रणेने तपास करणे व न्यायालयाने प्रकरण चालविणे याबाबत कोणताही आक्षेप नसून न्यायव्यवस्थेवर आमचा ठाम विश्वास आहे.  उलट न्यायपालिकेबाबत आदर असून योग्य न्याय मिळेल याची खात्री आहे. मात्र तसे करतांना यंत्रणांकडून न्यायपालिकेची दिशाभूल थांबविली पाहिजे असे आमचे प्रामाणिक मत आहे. न्यायव्यवस्थेकडून आम्हांला नक्कीच न्याय मिळेल आणि भुजबळ परिवार निर्दोष असल्याचे सिद्ध होईल याची आम्हाला खात्री आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून आमच्या नेत्यांना अन्यायकारकरीत्या तुरुंगात डांबून ठेवल्याची भरपाई सरकार कशी करणार ? हा प्रश्न आम्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.
 
राज्य व केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केले जात असतांनाही  केवळ चौकशीच्या नावाखाली आमच्या नेत्यांना असे लक्ष करुन देशातील बहुजन,ओबीसी,दलित,आदिवासी,भटके विमुक्त,अल्पसंख्यांक इत्यादी आणि कोट्यावधी शोषित,पिडीत व वंचितांचा आवाज बंद करणे हे अन्यायकारक आहे. तसेच हे पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा , देशातील लोकशाही व समान न्यायतत्वांचा पुरस्कार करणाऱ्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनेसुद्धा अयोग्य आहे. यामुळे भुजबळ परिवारावर केवळ सूडबुद्धीने व आकसाने कारवाई केली जात असल्याचा देशातील तमाम बहुजनांमध्ये संदेश जात आहे.
 
तरी, आपण याची जाणीवपूर्वक नोंद घेऊन बहुजन समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व आणि विकासपुरुष मा.श्री.छगनराव भुजबळ साहेब व त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मराठा व अन्य समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, परंतू ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भुमिका आहे, हे निवेदन ही विनंती.
येणेप्रमाणे आयोजित मोर्चाच्या भावनांचे प्रातिनिधिक निवेदन.
 
 
  (जी.जी.चव्हाण)          (मधुकरराव शंकरराव जेजुरकर)     (अॅड.जालिंदर वसंत ताडगे)         
 
 ( हाजी शौकत शाह )         (चंद्रकांत(भाई) शंकरभाई  कन्सारा)     (ज्ञानेश्वर रामदास शेवाळे) 
 
  (गोपिचंद जगन्नाथ पगारे)          (वसंत दगडू दुकळे)               (सौ.सुगंधा लक्ष्मण टोपले)
 
  (अशोक अवचित सूर्यवंशी)          (श्रीमती मुक्ताबाई एकनाथ मोटकरी)            (मनोहर कोरडे) 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आंदोलनावर महाराष्ट्राची आवाज (व्हिडिओ)