Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणपती आरती संग्रह भाग 6

गणपती आरती संग्रह भाग 6
आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।
सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥
 
पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।
उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥
 
नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।
म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥
 
****************************
आरती गौरिनंदनाची। गणाधिष विघ्ननाशनाची॥धृ॥
 
कमलसम अमरद्विरदवक्त्रां। एकरद मोदकर चरिंत्रा।
तुंदउदरांक लघुविचित्रा। दिव्य क्रमनीय पूतगात्रा॥चाल॥
पूर्ण राकेशतिलकभाला। शिरसिधृतगरप, मथितविधिवरप चकिरहरसुरप, अमिंतकृतवृद्धि मंगलाची॥
श्रीवृद्धि सत्सुमंगलाची॥ आरती॥१॥
 
तडित्सम हाटकपीत पट तें। सुवेष्ठित मेखलादिकटितें॥
मूषकारुढ सदृढघटितें। भयद तनु धरुनी अर्धत्रुटितें॥चाल॥
अटनि अरिभृंग पणिकमळी। कमलामरदंग, पिटिति करिभृदगसमरातिसुरंग भंगुनि सिंदुराची॥
सुरंग भंगुनि सिंदुराची॥ आरती॥२॥
 
हिमालयतन्वि  ह्रदयतोषा। सुखालय सदय सुजनपोषा॥
दॆन्य विपुदुपाद पूर्णशोषा। सदाशिवपद दुरितमीषा॥ चाल॥
समर सुरसाह्यकरण मान्या। अमितखल कंदन, करित यमसदन भरितनिजपदन, तोद्धवरवदन जयरवाची॥
करुनि ध्वनि गाति कीर्ती ज्याची॥ आरती॥३॥
 
मदन सौंदर्य चरणापाणी। ब्रह्मविद्यार्थ सिद्धखाणी॥
शिवप्रिय स्तविती विबुधश्रेणी। करित रविदास ललित वाणी॥ चाल॥
वरदमतिमधुरबाह्य थाया। कीर्ति गुणि अगुण, वर्ति परि सगुण, मूर्ति जन चरण वर्ति भवअर्तितमहाराची॥
जगदगुरु जननि हरिहरांची ॥ आरती ॥४॥
 
****************************
गणराया हे माझ्या ह्रदयाला ॥ ओवाळु आरती तव पायां ॥ धृ ॥
दे मति निर्मळ तव गुण गायां ॥ अद्वय मज सुख द्याया ॥ १ ॥
मज कल्पित विधिवदर्चनवंदन ॥ मानूनि घे आजि सदया ॥ २ ॥
महामायात्मज विघ्न हराया ॥ शांता पदरजी मन दे रहाया ॥ ३ ॥
 
****************************
गजवदना पुजूनी तुला करित आरती।
तारी मला षड्‌रिपु हे नित्य पीडीती॥धृ॥
 
अति सुंदर रत्नमाळा कंठि शोभती।
ऋद्दिसिद्धि नायिकादि चमर वारिती॥
इंद्रादिक सुरवरनर नित्य पूजिती।
निशिदिनि मी ध्यातो तुला तारी गणपती ॥१॥
 
भक्तकामकल्पद्रुम शारदापती।
वर्णिती हे वेद चारी आणखी स्मृती॥
निशिदिनि जे भजति तुला तारिं त्यांप्रती।
वसुदेव लीन पदीं देविभो मती ॥२॥
 
****************************
जय जय जी शिवकुमरा प्रणतवत्सला ।
ओवाळीन पंचारति देई सुमतिला ॥ धृ ॥
 
लंबोदर वक्रतुंड शोभतें किती ।
मोरमुकुट वैजयंती कंठी झळकती ॥
कनकवलय तोडर ते बहुत विलसती ।
होतो बहु तोष मनीं पाहुनीं तुला ॥ १ ॥
 
त्वत्स्वरुप त्वद्‌गुण हे स्वांति आणुनी ।
ओंवाळिन पंचारती लुब्ध होऊनि ॥
विनवितसे दत्तात्रय लीन भाषणी ।
भवतरणा अध वारुनि उद्धरी मला ॥ २ ॥
 
****************************
शिवतनया आजि दे मतिला ॥
आरती तुजला करिन मी भावें । वर दे तू मजला ॥ १ ॥
संकटनाशक बुद्धिप्रकाशक। नमितों मी तुजला ॥२॥
सिंदुरचर्चित शुंड विराजित। मुषकावरि बसला ॥ ३ ॥
मंगलदायक नाम तुझे मुखी । जपतां हरिं तरला ॥ ४ ॥
 
****************************
आरती शंकरतनयाची । मोरया पार्वतीनंदनाची ॥ धृ ॥
 
पद्मासमान तुझे चरण । वंदिती सकळ सुरमुनी तीं ॥
उंदिर वाहन हें तुझे । त्यावरी बैसोनी फिरसी । चाल ॥
वर्तुल  गजासमीप मान । पायीं पैंजण, रुणझुण करिती, सताल सुस्वर, नुपुरें, सुंदर, गणेशाची वाजति झनन विनायकाची ॥ १ ॥ ॥ आरती ॥ 
 
भाद्री शुद्ध चतुर्थीला । तुजला ते दिनीं पुजिती ॥
एकविस दुर्वांकुरानीं । अर्पूनी तुजला नित्य ध्याती ॥ चाल ॥
नामाचा अगाध हो महिमा । शेंदूर अंगी चर्चित सुंदर, कर्णी कुंडल, झळकती सिद्धि नायकाची लखलखती एकदंताची ॥ २॥ आरती ॥
 
माघ शुद्ध चतुर्थीला । गणपती पुळ्यामध्यें तुजला ।
तेथें यात्राचि भरुनि । जन्मोत्सव तुझा करिती ॥ चाल ॥
तुझी अगाध हो करणी । अग्रपूजेचा मान देऊनी, सकळ सुरवर ध्याऊनि सत्वर तुजलाची पूजिती ॥ मोरया, तुजलाची पूजिति ॥ ३ ॥ आरती ॥
 
संकष्टिचीं व्रतें तुझी । करतील नरनारी जगती ।।
त्यासी प्रसन्न तूं होसी । मनीषा पूर्ण करिसि त्यांची ॥ चाल ॥
वर्णकाय तुझा महिमा । तुझिया स्मरणे, हरतील पापे सद्‌बुद्धि तू देई आम्हांला ॥ हीच तुम्हा विनंती मोरया, हीच तुम्हां विनंती ॥ ४ ॥
 
****************************
आरती सप्रेम जयजय स्वामी गजवदना ।
तुझिया स्मरणें जाति पातकें पार्वतीनंदना ।
मोरया पार्वतीनंदना ॥ धृ ॥
मस्तकी मुकुट जडिताचा शोभतो जाण ।
कानी कुंड्लांची दिपकें झळकती परिपूर्ण ॥
पायीं घुंगुर वाळे घालुनी शोभती चरण ।
तुझिया दोंदावरी कंठी पदक घालुन ॥ १ ॥
मूषक वाहनावरी स्वारी करोनियां फिरसी ।
चंद्रम तुजला हांसे म्हणोनि शाप दिधलासी ॥
तेहतीस कोटी देव मिळोनि प्रार्थियलें तुजसी ।
दया करा महाराज उ:शाप देउनियां त्यासी ॥ २ ॥
भाद्रपद चतुर्थीचा दिवस सुदिन ।
त्या दिवशीं या चंद्रमाचे पाहूं नये वदन ।
हाच शाप दिधला त्यासी ऎका हो जन ।
जे जन पाहतील मुख त्यांसी दु:खपीडा जाण ॥ ३ ॥
वत्सें रक्षित असतां कृष्णें सोम पाहिला ।
स्यमंतक मणि जाबुवंते गृहासमिप नेला ।
आळ आला श्रीकृष्णावरी क्रोधातें चढला ।
शोधालागीं जातां तेव्हां जांबुवंत मिळाला ॥ ४ ॥
रामचंद्रे जांबुवंते होतें बोलणें ।
यास्तव आतां जाणे झाले युद्धाकारणें ।
युद्ध प्रसंग टळला तेव्हां कन्या देऊन ।
मणि आधन दिधला तेव्हा आले परतुन ॥ ५ ॥
सत्राजिता श्रीकृष्णाने मणि तो दिधला ।
असत्य भाषण करितां त्यांसी क्रोध बहु आला ।
सत्यभामा बोलावुनि दिधली कृष्णाला ।
मणि आंदण देऊनि त्यासी समाधान केला ॥ ६ ॥
गोपिकांचे गृही श्रीहरी भक्ती नवनीर ।
गोपी जाऊनि यशोदेपाशी सांगती वृत्तांत ।
कृष्ण तुझा चांडाळ येऊनि धरी अमुचा हस्त ।
काय सांगू यशोदे त्याची करणी अघटीत ॥ ७ ॥
ऎसी वार्ता कानी पडतां माता घाबरली ।
जाईनि एकदंतापाशी नवस बोलली ।
संकष्टीची व्रतें तुझी करीन मी आगळी ॥ ८ ॥
यशोदेचे नवस पूर्ण झाले  म्हणोनिया ।
व्रतें तुझी नरनारी करतील मोरया ।
पतित मी आळशी माझी मतिमंद काया ।
दास म्हणे माझें मस्तक नित्य तुझे पायी ॥ ९ ॥
 
****************************
मंगलदायक सिद्धीविनायक आरती ही तुजला ।
करितों भावे दुर्वापुष्पे वाहुनी चरणाला ॥ धृ ॥
कार्यारंभी पूजन तुझे सकल जन करिती ।
इच्छा पूरवूनी सकलां देसी सुखशांती सुमती ॥ १ ॥
सिंदुरखल मातुनी जेव्हा उपदाव केला ।
भक्त रक्षणासाठी धावुनी सिंदुरखल वधिला ॥ २ ॥
ऎसा अगाध महिमा तुझा परम अपार ।
वर्णावया शेषही थकला थकले सुरवर ॥ ३ ॥
दीनदास मी तुझ्या प्रसादा ।
तिष्टतसे दारी । प्रसन्न होऊनी निजदासाला संसारी तारी ॥ ४ ॥
 
 
****************************

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणपती आरती संग्रह भाग 5