रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल...रोड ओपनिंग करणारे रस्त्यावरील पोलिसांच्या तुकडय़ा...हे दृश्य पाहून मनात अनामिक भिती वाटत होती.
गडचिरोलीत आल्यापासून अतिसंवेदनशील व अतिदुर्गम भाग समजल्या जाणार्या भामरागडला जाण्याचा योग आला. निमित्त होते राज्याचे गृहमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांची हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पास भेट. सकाळी ५ वाजता गडचिरोलीवरुन भामरागडकडे निघालो..वाटेत लागणार्या छोटय़ा-छोटय़ा गावातील निसर्ग मनाला मोहून टाकणारा होता, आदिवासी बांधव आपले नित्यक्रम करताना दिसत होते.
गडचिरोली पासून सुमारे २०० किलोमीटरवर हेमलकसा हे ठिकाण आहे. पर्लकोटा, पामुलगौतमी आणि इंद्रावतीच्या तीरावरील निसर्गाच्या सान्निध्यात माणूस जगवण्याचे काम मागील ३५ वर्षापासून अखंडपणे लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु आहे.
सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे चॉपर लोक बिरादरीतील आश्रमशाळेतील मैदानावर उतरणार म्हणून ते बघण्यासाठी शाळेतील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी मैदानावर बसून वाट पाहू लागली. त्यांच्या निरागस चेहर्यावर कुतूहलाचे भाव दिसत होते. आर.आर. पाटील यांचे स्वागत करण्यासाठी जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे हे संपूर्ण कु टुंबासह मैदानावर उपस्थित होते.
लोक बिरादरी मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांनी अनाथ प्राण्यांसाठी प्राणिसंग्रहालय तयार केले आहे याला पालकमंत्र्यांनी भेट दिली. प्राणिसंग्रहालयात सात-आठ जातीचे कुत्रे, बिबटे, रानडुक्करे, कोल्हे, अस्वल, हरणे, माकड, मगरी, नाग, पटेरी मण्यार, घोणस, अजगर, साळिंदरे, घुबडे, शॅमेलिऑन अशा अनेक प्राण्यासोबत डॉ. आमटे यांचे प्रेम व आपुलकी बघून पाटील भारावून गेले होते. येथील आश्रम शाळेस भेट दिली असता पाटील यांना दोन मुले शाळेतील बाहेरील फलकावर दिनविशेष लिहिताना दिसली, तुझे नाव काय? कोणत्या गावाचा ? कोणत्या वर्गात शिकतो ? अशा आस्थेने पाटील यांनी त्या मुलांची विचारपूस केली. तसेच शाळेतील पहिल्या वर्गामध्ये जाऊन मुलांशी आपुलकीने संवाद साधला.
भामरागड हा भाग अत्यंत दुर्गम असल्यामुळे या ठिकाणी आरोग्य उपचाराची आधुनिक सोय उपलब्ध नसल्याने अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव लोक बिरादरी दवाखान्यात विनामूल्य उपचार घेण्यासाठी येतात. या दवाखान्यात छत्तीसगढ, आंध्रप्रदेश या राज्यातील लोक देखील उपचारासाठी येत असतात. आर.आर.पाटील यांनी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची भेट घेवून त्यांची आस्थेनी चौकशी केली.
डॉ. प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून जंगलदर्यातल्या आदिवासी माणसला जगविण्याचे प्रयत्न सुरु असलेले कार्य बघितल्यास मनात आदर निर्माण होणे स्वाभाविक आहे.
या दुर्गम भागात राहणार्या आदिवासी बांधवाकरिता लोक बिरादरी प्रकल्प हा जणू अरण्यातील प्रकाश वाट ठरल्याची अनुभूती येथे भेट दिल्यावर दिसून येते.