आपला आठवडाभरचा थकवा दूर करण्यासाठी आपण कोणते न कोणते उपाय करीत असतो. त्यामध्ये आपल्या त्वचेची खास करून आपल्या चेहरा ताजा तजेल दिसण्यासाठी काही न काही उपाय करतो. त्यापैकी एक आहे "फेशियल ट्रीटमेंट" आणि त्यामध्ये देखील "स्टीम" घेणं हे महत्त्वाचे आहे. स्टीम किंवा गरम पाण्याची वाफ घेण्यामुळे आठवड्याचा थकवा तर दूर तर होतोच आणि आपल्या चेहऱ्याचे रोमछिद्र देखील उघडतात, तसेच त्वचे मधील रक्तपुरवठा वाढून त्वचा तजेल होते.
जर आपल्याला हे पार्लर मध्ये जाऊन करणं शक्य होत नसेल तर आपण घरातच गरम पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेऊ शकता. त्यासाठी आम्ही आपल्याला स्टीम कशी घ्यावी याची योग्य पद्धत सांगत आहोत. चला तर मग स्टीम कशी घ्यावी आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
गरम पाण्याची वाफ घेण्याची पद्धत -
बहुतांश लोकं गरम पाण्याची वाफ घेण्यासाठी "फेस स्टीमर" चा वापर करतात. जर आपल्या घरात ते नसल्यास आपण चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करावं. गरम पाणी झाल्यावर भांडे गॅस वरून खाली काढून घ्या. नंतर आपल्या डोक्यावर टॉवेल झाकून आपला चेहरा त्या भांड्यावर झाका आणि सर्व बाजूने टॉवेल झाकून घ्या. आता आपल्या चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. डोळे घट्ट मिटून दीर्घ श्वास घ्यावा. आणि जेवढे सहन होईल तेवढंच करावं. असे केल्याने आपल्या त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. आणि त्वचा मधील सर्व घाण बाहेर पडते. आणि त्वचा स्वच्छ आणि तजेल होते. त्याच बरोबर त्वचेमधील निस्तेजपणा कमी होतो. त्वचा चकाकते.
फायदे -
चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचा स्वच्छ होते. हे एका क्लिन्झर सम कार्य करतं. गरम पाण्याची वाफ घेतल्यानं त्वचेवरील आणि रोम छिद्रामध्ये जमलेली घाण बाहेर पडते. चेहऱ्यावर मुरूम, पुळ्या, पुटकुळ्या झाल्या असल्यास गरम पाण्याची वाफ घेताना काळजी घ्यावी.
गरम पाण्याची वाफ किंवा स्टीम घेतल्यावर चेहऱ्याची रोम छिद्र उघडतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. या वर आपण कोणतंही ब्युटी क्रीम लावल्यास त्वचा क्रीम शोषून घेते. त्याचे चांगले परिणाम चेहऱ्यावर दिसून येते.
स्टीम घेतल्यानं रक्त प्रवाह चांगला होतो. ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात चेहऱ्यापर्यंत पोहोचतात. परिणामी निस्तेज त्वचा टवटवीत होते आणि चकाकते. चेहरा नैसर्गिकरीत्या चमकतो.
स्टीम घेतल्यानं ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स झाले असल्यास ते दूर होतात. आपल्या त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर त्वचेतून सीबम च्या स्रावामुळे मिळतं. त्यामुळे अतिरिक्त तेल रोमछिद्रामध्ये जमा होतं. जेणे करून मुरूम, ब्लॅक किंवा व्हाईट हेड्स होतात. हे दूर करण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेऊन या त्रासाला दूर करता येणं सोपं होतं.
स्टीम घेतल्याने त्वचेस अँटी एजिंग फायदे मिळतात जेणे करून आपली त्वचा तरुण राहते. सरत्या वयामुळे आपल्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या दिसू लागतात. ते दिसू नये त्यासाठी आपण गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे चेहऱ्याची मृत त्वचा गळून पडते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चकाकी आणि तजेलता येते.