या मशिदीचा इतिहास अज्ञात आहे. त्यामुळेच कुणी ती 1100 वर्ष जुनी असल्याचे सांगतात, तर कुणी 101 वर्ष जुनी. काहीही असो एक गोष्ट मात्र नक्की, की इथे दर गुरुवारी भुतबाधेने झपाटलेल्या हजारो लोकांची गर्दी होते. संपूर्ण परिसरात लोबानचा सुगंध पसरलेला असतो व भुतबाधेने पीडीत असलेल्या लोक वेड्या वाकड्या हलचाली करतात व मोठ-मोठ्याने वेगवेगळे आवाज काढीत असतात. असा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. एक वेळ असे वाटते की, आपण कुठल्या वेगळ्या प्रातांत आलो आहे. मशिदीचा सेवक अर्जुनसिंहकडून याबाबत माहिती घेतली असता त्याने सांगितलं, की कोणतीही व्यक्ती येथे येऊन पाच गुरुवार बाबांची मनोभावे सेवा करील ती सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त होईल. केवळ भूतप्रेतांपासून मुक्तीच नव्हे तर अनेकांच्या इच्छाही बाबांच्या कृपेने पूर्ण झाल्या आहेत. त्यांच्या आशीर्वादानं अनेक अंधांना दृष्टी मिळाली तर अनेकांना अपत्य प्राप्ती झाली आहे.
या बाबतीत एक भाविक वामीक शेख यांनी सांगितलं, की माझ्या जीवनात जेव्हा-जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा मी बाबांना शरण आलो आणि मला सर्व काही मिळालं. अनेक गंभीर आजारांचे रुग्ण येथून बरे होउन गेल्याचे मी पाहिले आहेत.
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणार्या विज्ञानाच्या युगात भूत-प्रेत ही एक भ्रामक कल्पना असल्याचे मानले जाते. त्याचवेळी इथं आलेले शेकडो लोक मात्र आपल्या श्रद्धेशी घट्ट चिकटून बसलेले असतात.