अपंगांना चालायला लावणारा बाबा
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपली भेट घडवतोय ती एका आगळ्या वेगळ्या बाबाशी. त्यांचं नाव आहे १०००८ गुरूशरण महाराज. कोणत्याही प्रकारचं अपंगत्व आपण बरं करतो, असा या बाबांचा दावा आहे. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड भागात पंडोखार या गावात हे बाबा रहातात. पण ठिकठिकाणी बाबांचा दरबारच भरतो. या दरबारात लांबून लांबून रूग्ण येतात. दरबार भरल्यावर बाबा एकेक रूग्णाला बोलावतात. त्याच्या रोगाची माहिती जाणून घेऊन ती एका कागदावर लिहितात. त्यानंतर त्या अपंग व्यक्तीस चालायला लावतात. बाबांच्या बोलण्यामुळे रूग्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते चालायला सुरवात करतात. पण सगळेच चालतात असं नाही. काही लोक लगेच खाली पडतात. पण मारूतीरायाच्या कृपेने हे रूग्ण लवकरच बरे होतील, असा दावा बाबा करतात. हे होत असतानाच एक व्यक्ती बाबा बसलेल्या मंचावर चढली आणि तिनं बाबांना हार घातला. या माणसाला अजिबात चालता येत नव्हतं. पण बाबांच्या कृपेने त्याला आता चालता येऊ लागलं आहे, असे यावेळी सांगण्यात आलं. बाबा आलेल्या प्रत्येक रूग्णाला एक धागा देतात आणि तो गळ्यात घालायला सांगतात. त्यानंतर पाच किंवा चार आमावस्येपर्यंत आपल्याकडे यायला सांगतात. बरे होण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्याच्या मनावर बिंबविण्यात येते.
बाबा कोणतेही अपंगत्व दूर करण्याचा दावा कितीही करत असले तरी डॉक्टरी जगतात मात्र, त्याला अजिबात किंमत नाही. बाबांसमोर काही वेळा लोक चालतात, ते अचानक उत्पन्न झालेल्या आत्मविश्वासामुळे. पण त्यामुळे तो रोग बरा झालेला नसतो. उलट अशा हालचालींमुळे एखादे हाड-बिड तुटल्यास त्याचा तोटाच होऊ शकतो. काहींना आपण मानसिकदृष्ट्या आजारी पडल्याचं वाटत असतं. असे लोक बाबांसमोर सफाईने चालू लागतात. पण मुळात त्यांना काही झालेलंच नसतं. पण अशी केसही हजारात एखादी असते. या प्रकाराविषयी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला जरूर कळवा.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा.....