अश्वत्थाम्याचा जन्म महाभारतकाळात म्हणजे द्वापारयुगात झाला होता. कौरव पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांचे तो मुलगा. महाभारतातील युद्धावेळी द्रोणांनी राजगुरू असल्याने कौरवांची बाजू घेतली. युद्धात पिता पुत्रांच्या या जोडीने पांडवांचे मोठे नुकसान केले. त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कूटनीतीचा अवलंब करायला सांगितला.
त्यानुसार रणभूमीवर अश्वत्थाम्याच्या मृत्यूची वार्ता पसरली. पण तिची खातरजमा करणार कशी? द्रोणाचार्यांनी नेहमी खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या युधिष्ठिराकडे धाव घेतली. युधिष्ठिराने सांगितले, 'अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो वा' (अश्वत्थामा मरण पावला पण तो हत्ती की मनुष्य हे माहीत नाही.)
हे ऐकल्यानंतर द्रोणाचार्य मानसिकरीत्या एकदम खचले. मुलावरील आत्यंतिक प्रेमापोटी त्यांनी शस्त्र खाली ठेवले. हीच संधी साधून पांचाल देशाचा राजा द्रुपदाचा पुत्र धृष्टद्युम्न याने त्यांचा वध केला. प्रत्यक्षात तेव्हा अश्वत्थामा जिवंत होता. अश्वत्थामा नावाच्या हत्तीच्या मृत्यूची वार्ता तेव्हा जाणीवपूर्वक पसरवण्यात आली होती.
पित्याच्या मृत्यूनंतर अश्वत्थामा सूडाने पेटून उठला होता. त्याने पांडवांना ठार मारण्याची प्रतिज्ञाही केली होती. युद्धानंतर त्याने शामियान्यात झोपलेल्या पाच जणांना ठार मारलेसुद्धा. पण ती द्रौपदीची मुले असल्याचे नंतर समजले. मुलांच्या मृत्यूने वेडीपिशी झालेल्या द्रौपदीने अश्वत्थाम्याला पकडून आणण्यास सांगितले. त्याला कृष्णार्जुनाने पकडले. पण कृष्णाने अर्जुनाला त्याला मारण्याऐवजी त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला. मणी काढून घेतल्यानंतर होणारी वेदना त्याला आपल्या कृत्याची आठवण देईल, असा कृष्णाचा हेतू होता.
आपल्या या वेदनेतून वाहणारे रक्त थांबविण्यासाठी अश्वत्थामा इकडे तिकडे भटकत हळद आणि तेल मागत असल्याच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवर असलेल्या गौरीघाटावरही अश्वत्थामा भटकत असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर अश्वत्थाम्याचं ठाणे महाराष्ट्रात सातपुड्यातही आहे. अस्तंभा (ता. तळोदा, जि. नंदुरबार) येथे दरवर्षी धनत्रयोदशीला तिथे यात्रा होते.
कपाळावरचा मणी कापल्यानंतर अश्वत्थामा थंड हवेच्या शोधात तिथं येऊन राहिला आहे, असे म्हणतात.