श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला आज देत आहोत एका अनोख्या उपचार पद्धतीची माहिती.
काविळीची भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात असतेच. हा रोग माणसाचे शरीर जीर्ण करुन टाकतो. योग्य उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचीही भीती असते. त्यासाठी डॉक्टरकडे जाणे योग्य असते. पण काही लोक मात्र डॉक्टरकडे न जाता बाबा-बुवांकडे जाऊन उपचार करून घेतात. इंदूरमधील मनजीत पाल सलुजा हेही अशा उपचार करणार्यांपैकी एक आहेत. सलुजा यांचे दुकान असून, दुकानदारीव्यतिरिक्त ते काविळीवर उपचार करतात. आपल्याकडे ही अनोखी विद्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
ते रुग्णाच्या कानावर कागदाचा तुकडा लावतात आणि मेणबत्तीने त्याला जाळतात. हे करताना ते गुरुवाणीचा उच्चार करतात. मनजीत धर्माने शीख असले तरी त्यांची गणपती बाप्पावर निस्सिम श्रद्धा असून, आपल्या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी ते गणपतीची पूजा करतात. कागद जळाल्यानंतर कानाच्या कोपर्यांमध्ये पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ साचण्यास सुरुवात होते. मनजीत याला काविळ असे म्हणतात या पदार्थाच्या माध्यमातून काविळ रुग्णाच्या शरीराबाहेर पडत असल्याचा त्यांचा दावा आहे.
उपचाराला येणार्या रुग्णाला पहिल्या दिवशी आपल्या सोबत हार- फुले, अगरबत्ती, आणि नारळ आणावेच लागते. उपचारानंतर रुग्ण येथे यथाशक्ती दान करतात. आपण नि:शुल्क सेवा पुरवत असून, रुग्ण स्वेच्छेने येथे पैसे ठेऊन जात असल्याचे मनजीत यांचे म्हणणे आहे.
हा उपचार म्हणजे अध्यात्माची शक्ती असून, आपल्याला देवाने दिलेली ही देणगी असल्याचे मनजीत यांचे म्हणणे आहे. आयुर्वेदिक आणि अलेपॅथिक औषधांचे मिश्रण करुन ते आलेल्या रुग्णांना औषधही देतात. मनजीत रोज 80 ते 90 रुग्णांवर उपचार करतात.
आपल्याकडे येणार्यांमध्ये रुग्ण तर असतातच परंतु काही डॉक्टरही आपल्या नातेवाईकांना घेऊन आपल्याकडे येत असल्याचे मनजीत यांचे म्हणणे आहे. मनजीत यांनी केलेला दावा आपल्याला खरा वाटतो का? विज्ञानाच्या या युगात असे घडू शकते का? आपल्याला काय वाटते आम्हाला जरूर कळवा.