भारतात बाबा, महाराजांची कमी नाही. तुमच्या वाणीत दम असला व तुम्ही लोकांना वश करू शकला, तसेच लोकांवर भुरळ पाडू शकला की तुम्ही बाबा, महाराज होण्यास लायक झाला असं म्हणायला हरकत नाही. मग राजकीय नेत्याप्रमाणे शिक्षण कमी असले तरी चालेल. बाबा, महाराज होणे हा बिनभांडवली धंदा झालेला आहे. कोणीही उठतो बाबा, महाराज होतो, असे वृत्तपत्रातील विविध बातम्यांमध्ये पाहावास मिळते. लोक विचारपूस न करता, पूर्ण माहिती न घेता या भोंदू बाबा, महाराज, यांच्या नादी का लागतात? त्यांचे चरणी पैसे का ठेवतात? त्यांना महत्त्व का देतात? याचा शोध कोणी घेतच नाही. त्यामुळे अशा बाबा, महाराजांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झालेली दिसते. हे बाबा लोक मोठय़ा आरामात, चैनीत राहतात. आसाराम बापू, सतपाल यांचे आश्रम देशभरात सर्वत्र आहेत. या सर्व लोकांपाशी प्रचंड पैसा, संपत्ती, जमीन आहे. त्यांचे शिष्य, चेले बाबा कसे श्रेष्ठ आहेत, त्यांनी किती चमत्कार केले हे प्रवचन पुस्तके, सीडीद्वारे सांगतात. देशातील बर्याच आश्रमाला मी भेटी दिल्या. त्यांना देव न भेटता पैसा मात्र भरपूर भेटला आहे. मध्यंतरी दिल्लीला एका चर्चासत्रासाठी गेलो असता एका स्थानिक व्यक्तीने मला रामलीला मैदानावरील त्यांच्या गुरूच्या प्रवचनाला, सत्संगाला नेले. या गुरुच्या प्रवचन, सत्संगाला चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी तसेच बरेच नट, नटी आले होते. हेमामालिनीचा नृत्याचा कार्यक्रमही झाला. मी पहिल्या रांगेत होतो. त्या गुरूंचा शिष्य लाउड स्पीकरवरून सांगत होता. अमुक महिलेने सोने, चांदी दागिने दान दिले. काहींनी एक लाखाचेवर देणगी दिली. माझ्या शेजारी एक सुशिक्षित महिला बसली होती. त्यांनी मला विचारले, बाबांना मी एक लाख देऊ इच्छिते, मी कुणाला भेटावे. मी त्या महिलेला विनंती केली. तुम्ही बाबांना एक लाखाची देणगी देणपेक्षा शाळेतील, कॉलेजातील एखाद्या अनाथ, गरीब विद्यार्थ्याचा खर्च उचला. त्याला गणवेश, पुस्तके द्या. त्याला आर्थिक मदत करा. अथवा चांगल्या शाळा, कॉलेज, एनजीओला तुमची देणगी द्या. त्या उच्चविभूषित महिलेला माझे विचार पटले. तरीही तिने बाबाच्या झोळीत 50 हजार अखेर टाकलेच.
देशात आज कितीतरी गरीब, होतकरू अनाथ मुले म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली अभ्यास करीत आहेत. त्यांना शैक्षणिक फी भरणे अवघड जात आहे. पुण्यात अशाच एका नामवंत बाबांच्या कार्यक्रमाला, सत्संगाला गेलो. स्टेज, अन् भोजन इत्यादीवर संयोजकांनी प्रचंड खर्च केला. बाबांना एकाच दिवशी 20 लाखाच्यावर देणग्या मिळाल्या. परंतु या बाबांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना, शेतकरी आत्महत्या करणार्या त्यांच्या परिवारास एक नव्या पैशाची देणगी दिली नाही. चाळीस लाखांच्यावर रक्कम घेऊन बाबा दिल्लीला विमानाने निघून गेले.
तात्पर्य बाबा, महाराज यांच्यावर पैशाची खैरात करण्यापेक्षा त्यांच्या आशीर्वाद घेण्यापेक्षा धनिक, दानशूर, श्रीमंत व्यक्तींनी अनाथ, पीडित, शोषित दीनदुबळ्यांना मदत करावी. त्यांच्यासाठी मोफत अन्नछत्रे रोज चालवावित. विद्यार्थ्यांच्या फीज भराव्यात. त्यांना पुस्तके, वह्या खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करावी. अन्न, वस्त्र, घर निवारा द्यावा. त्याच्यातच परोपकार आहे. खरे पुण्या त्यांना मिळणार आहे. बाबांना पैसे दिल्याने त्यांचे कल्याण होते. काही संत, चांगले काम करीत आहेत पण त्यांचे प्रमाण कमीच आहे. गरिबांना मदत हेच खरे पुण्य-मोक्ष आहे.