चाकूने ऑपरेशन करणारा सत्यनाम बाबा
''
आपला देश मुर्ख लोकांचा देश आहे. आम्हीही त्यातले एक. म्हणूनच आम्ही स्वतःला ईश्वर मानणाऱ्या बाबाच्या सांगण्याला भुललो'' वेबदुनियाशी बोलताना सेमल्या चाऊ (मध्य प्रदेश) येथील सुरेश बागडी सांगत होते. त्यांच्याशी बोलताना लोकांना फसवून लोक स्वतःची पोळी कशी भाजून घेतात ते समजले आणि मन उद्विग्न झाले. त्याचे झाले असे, राजस्थानातील बासवाडा येथील छिंच गावात स्वयंभू भगवान सत्यनाम विठ्ठलदास बाबा रहातो. त्याच्या कथित दैवी चमत्काराची व त्याच्याकडे असणाऱ्या शक्तीची चर्चा बागडी यांच्या गावापर्यंत पोहचली. गावातील काही लोकांनी सत्यनाम बाबाच्या काही सीडी वाटल्या. त्याच्याबरोबर प्रसिद्धी पत्रकही होते. त्यात मा खोडीयार मंदिराचे पुजारी असलेल्या या सत्यनाम बाबाकडे दैवी शक्ती आहे. त्यांना देवानेच लोकांचे दु:ख संपविण्यासाठी पाठविले आहे. ते प्रत्येक आजारावर नि:शुल्क उपचार करतात, असे लिहिले होते. एड्स व कॅन्सर यासारख्या आजारांवरही ते इलाज करतात, असेही त्यात म्हटले होते.सीडीत या कथित भगवंताला एका
चाकूच्या मदतीने पेशंटच्या पोटाचे ऑपरेशन (?) करताना दाखविले आहे. या ऑपरेशनच्या सहाय्याने हा बाबा लोकांना बरे करण्याचा दावा करीत होता. सीडीत बाबाला ईश्वराच्या रूपात दाखविले आहे. पोलिसांची खाकी वर्दी घातलेले काही जण त्याचे संरक्षण करताना दिसतात. हे पाहिल्यानंतर लोकांवर त्यांचा खूप प्रभाव पडतो व ते त्याच्या नादी लागतात. ही सीडी आमच्या खास व्हीडीओमध्ये बघता येईल.
सत्यनाम बाबा फक्त शनिवारीच उपचार करतो. उपचार करण्याची वेळही रात्री बारा ते तीन आहे. बाबा या वेळेतच लोकांचे ऑपरेशन करतो. यावेळी बाबाचे चेले मंदिराचा दरवाजा बंद करून घेतात. या कथित भगवंताकडून फसविल्या गेलेल्या राजूबाईने सांगितले, की तिच्यासोबत पाच स्त्रियांनी गर्भाशयाचे ऑपरेशन केले होते. त्यातली एकही बरी झाली नाही. उलट गलथानपणामुळे एका बाईचा मृत्यू झाला.राजूबाईने वेबदुनियाशी बोलताना सांगितले, की सत्यनामबाबाने सीडीत दाखविल्याप्रमाणे ऑपरेशन केले नाही. त्याने पोटावर भाजी चिरण्याच्या चाकूने चीर पाडली. त्यामुळे थोडे रक्त निघाले. त्यानंतर आता तू बरी होशील, असे सांगून निरोप दिला. या जखमेवर त्याने राख लावली. कदाचित राखेत काही तरी नशिले औषध मिसळले असावे. कारण राख लावल्यानंतर काही दिवस चक्कर येत होती व सुस्ती जाणवत होती, असे या महिलेने सांगितले. बाबा फक्त चाकूने नकली ऑपरेशनच करत नाही, तर नारळ फोडून फूल व कूंकूदेखिल काढून दाखविण्याचा दावा करतो. भक्तांना प्रभावित करण्यासाठी असे परत परत केले जाते. तेथे गेलेल्या सुनीलभाईंनी सांगितले, की त्यांनी व्यवस्थित निरीक्षण केले तेव्हा नारळ फेविकॉलने चिकटवल्याचे लक्षात आले. पण सत्यनामच्या चेल्यांमुळे काही बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही. सुनील म्हणाला, की सत्यनामने अनेक
लाठीधारी मंडळी पोसली आहेत. एखाद्या भक्ताने त्याच्या विरोधात आवाज उठवला, ऑपरेशनचे पाचशे रूपये व औषधाचे तीनशे रूपये दिले नाही तर ही मंडळी त्यांना बाहेर फेकून देतात. अशा प्रकारे हा बाबा हजारो लोकांना मुर्ख बनवून त्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. अशा कथित भगवंत असणाऱ्या नि भोळ्याभाबड्या बाबांबाबत तुम्हीला काय वाटते?
(बाबाच्या चाकूने केल्या जाणार्या कथित ऑपरेशनची सीडी आम्हाला संबंधित रूग्णांनीच उपलब्ध करून दिली.)