जलिकट्टू- अमानुषता की शौर्य?
श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात आम्ही आपल्याला एक विचित्र खेळ दाखविणार आहोत. हा खेळ परंपरेतून आला आहे, मात्र त्यातील नृशंसता कोणत्याही संवेदनशील माणसाला जाणवेल. तमिळनाडूत खेळल्या जाणाऱ्या या खेळाला जलिकट्टू असे म्हणतात. पोंगल या दक्षिणेतील उत्सवाच्या काळात हा खेळ खेळला जातो. महाराष्ट्रात जशी कोबंड्यांची झुंज लावली जाते. तशी येथे बैलांची परस्परांत आणि माणसांमध्ये झुंज लावली जाते. यालाच जलिकट्टू असे म्हणतात.
मुक्या जनावरांचा असा हिंसक पद्धतीने वापर केला जात असल्याने तो वादग्रस्तही ठरला आहे. पशू कल्याण बोर्डाने नुकतीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या खेळावर बंदी आणण्याची मागणी केली होती. न्यायालयाने बंदी घातली, पण नंतर तमिळनाडू सरकारच्या विनंतीवरून सुरक्षितेच्या सर्व बाबी उपलब्ध असल्यास सरकारी देखरेखीखाली हा खेळ खेळण्यसा परवानगी दिली. हा खेळ तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील आलंगनल्लूर आणि पलमेणू नावाच्या गावी होतो. तमिळ साहित्यात या खेळाला शौर्याचा अविष्कार म्हटले आहे. माजलेल्या बैलाला काबूत आणणाऱ्या पुरूषाशीच स्त्रिया विवाह करतात. बैलाला आपल्या काबूत करणे हा जीवन-मृत्यूच्या रेषेवरील खेळ आहे. गेल्या 400 वर्षांपासून हा खेळ खेळला जातो. फरक फक्त इतकाच आहे, की आता या खेळात बैलांना आधीपासूनच खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या शिंगांचा अणूकुचीदारपणा कमी केला जातो आणि सुरक्षेची काळजी घेतली जाते.
जी व्यक्ती आपल्यापेक्षा दसपट मोठ्या असलेल्या बैलाला काबूत आणेल तोच खरा पुरूष असे या परिसरात म्हटले जाते. हा बहुमान (?) मिळविण्यासाठी लोक जीवावर बेतेल असे धाडस करायलाही तयार होतात. काही अटींवर सर्वोच्च न्यायालयाने हा खेळ खेळण्यास परवानगी दिली. या आदेशानंतर हा खेळ 16 आणि 17 जानेवारीला जिल्हा प्रशासनाच्या संरक्षणार्थ पलमेणू आणि आलंगनल्लूर येथे हा खेळ खेळविण्यात आला. यावेळी येथे हजारो विदेशी पर्यटक उपस्थित होते. आता हा खेळ अमानवी आहे की शौर्याचा कस पाहणारा ते तुम्हीच ठरवा. आणि हा खेळ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी व्हीडीओ पाहायला विसरू नका.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा......