तंट्या भिल्लाला रेल्वेचाही 'नमस्कार'
श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आजच्या भागात तंट्या भिल्लाची सत्यकथा आपल्यासमोर मांडत आहोत. स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेल्या तंट्याला सरकार कदाचित विसरलेही असेल पण मध्य प्रदेशातील महू क्षेत्रातील नागरिकांच्या हृदयात मात्र आजही तो जिवंत आहे.
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेच्या अल्याड आणि पल्याड तंट्या भिल्लचा चांगलाच दरारा होता. इंग्रजांचा खजिना लुटून गरीबांना वाटणारा तंट्या आदिवासी लोकांचे तर दैवतच बनला होता. इंडियन रॉबिनहूड या नावाने पुढे तो प्रसिद्धीस पावला. तंट्याने इंग्रजांना हैराण करून सोडले होते. इंग्रजांनी त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केले होते. पण हाताला लागला असे म्हणेस्तोवर त्याने अनेकदा इंग्रजांच्या हातावर तुरी दिली. आदिवासींचे दैवत बनलेल्या तंट्याकडे काही गुप्त शक्ती असावी अशीही त्यांची श्रद्धा होती.
इंग्रजांना जेरीस आणणारा हा तंट्या अखेरीस त्यांच्या तावडीत सापडला. मग इंग्रजांनी वेळ न घालवता त्याला मध्य प्रदेशातील महूजवळ पातालपानी या ठिकाणी त्याची हत्या केली. त्याच्या हत्येच्या ठिकाणहूनच रेल्वे मार्ग जातो. या हत्येने तंट्या संपला असे इंग्रजांना वाटले. पण त्याचा आत्मा जिवंत होता आणि आहे असे लोकांचे म्हणणे आहे. म्हणूनच तंट्याच्या हत्येनंतर या मार्गावर सतत अपघात होऊ लागले. इंग्रजांसोबत लोकही या अपघातात बळी पडायला लागले. नेहमी होणारे हे अपघात लक्षात घेऊन तेथील रहिवाशांनी त्या जागी तंट्याचे मंदिर बांधले. तेव्हापासून आजपर्यंत मंदिराच्या समोर प्रत्येक रेल्वे थांबते. तंट्याला नमस्कार करूनच गाडीचा गार्ड हिरवा झेंडा फडकावतो.
पण रेल्वतील कर्मचारी मात्र, तंट्यासाठी गाडी थांबते हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या मते, पातालपानी येथून रेल्वेचा मार्ग बदलतो. तेथून कालाकुंडपर्यंत चढाव आहे. त्यामुळे ब्रेक चेक करण्यासाठी रेल्वे थांबवली जाते. आता मंदिर असल्यामुळे सहजच हात जोडले जातात, ही बाब वेगळी. पण खास त्यासाठी गाडी थांबवली वगैरे जाते हे सगळे बिल्कुल झूठ आहे.
अर्थात रेल्वे कर्मचारी काहीही सांगोत, पण रेल्वे गाडी थांबवली जाते ही बाब खरी आहे. तंट्याला नमस्कार न करता गाडी पुढे नेली तर अपघात होतो, अशी पक्की श्रद्धा रेल्वेगाडी चालकांच्या मनात आहे. तशीच ती परिसरातील रहिवाशांच्या मनातही आहे.