Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अथांग 'संगणक जगत'

- अभिनय कुलकर्णी

अथांग 'संगणक जगत'
माधव शिरवळकर हे नाव मराठी वाचकाला विशेषतः तंत्रज्ञानविषयक वाचकाला नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण येते आहे. लोकसत्तात गाजलेल्या संगणक जगत या सदराचे लेखक ते हेच. याशिवाय समग्र राम गणेश गडकरी हे मराठीतील पहिले ई- बुकही त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर केशवसुत, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र स्मृतिचित्रे यासह सुमारे पन्नास मराठी, इंग्रजी ई बुक्सची निर्मिती केली आहे.

तर अशा या शिरवळकरांचा ब्लॉग म्हणजे संगणकावर काम करणार्‍यांचा मार्गदर्शक आणि जालावर भटकंती करणार्‍यांसाठीचा पथदर्शक आहे. हे मार्गदर्शक आणि पथदर्शक वगैरे जड शब्द का वापरले असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. पण या ब्लॉगला तुम्ही भेट दिली तर याचा अनुभव तुम्हालाही आल्याशिवाय रहाणार नाही. हा ब्लॉग म्हणजे संगणकाविषयीचा एनसायक्लोपिडीया किंवा आन्सर.कॉम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

संगणकविषयक कोणताही प्रश्न तुम्हाला पडलेला असो या ब्लॉगद्वारे शिरवळकरांना तो विचारल्यास तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. Tiff, JPG, GIF यांचा लॉंगफॉर्म म्हणजे काय पासून ते Blue Ray Disk म्हणजे नेमकं काय किंवा तुमच्या संगणकात येणारा प्रॉब्लेम असो किंवा एखाद्या संगणकीय जगतातील संज्ञेविषयी तुमच्या मनात दाटलेलं कुतूहल असो, अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात. या प्रश्नांची उत्तरे देऊनच शिरवळकर थांबत नाही तर उत्तरासंदर्भात अधिक माहिती देणार्‍या संकेतस्थळांचा दुवाही ते देतात. त्यामुळे तेथे जाऊनही आपल्याला ती माहिती मिळू शकते. शिवाय आगामी काळासाठी आपल्याकडे अशा संकेतस्थळांची बॅंकही तयार होते. माहिती शेअर करण्याचा हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे.

शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते जालावरचे अस्सल भटके आहेत. त्यांच्या या भटकंतीत त्यांना अनेक माहितीपूर्ण संकेतस्थळं सापडतात. आठवड्याची सात संकेतस्थळं म्हणून ते त्याची संक्षिप्त माहिती देतात. ते शिफारस करतात त्या संकेतस्थळांचे विषयही वैविध्यपूर्ण असतात. त्यामुळे आपल्या माहितीच्या कक्षाही चांगल्याच रूंदावरतात. उदाहरणेच सांगायची झाली तर व्होडका कसा बनवावा, त्याचा इतिहास, सॅंडविच शब्द कसा आला, त्याचा इतिहासा, वृत्तपत्रांचा इतिहास दर्शविणारी साईट, मोफत छायाचित्रे डाऊनलोड करण्याची सुविधा कुठे आहे, रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना विविध चाचण्यांबद्दल माहिती कुठून मिळेल अशा अक्षरशः शेकडो संकेतस्थळांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. माहितीचा हा पूर उर धपापून टाकणारा आहे.

याशिवाय कुठे काय आहे आणि कुणासाठी ते उपयुक्त आहे याची शिफारसही ते करतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयांसंदर्भात किंवा आपल्याशी संबंधित विषयाचे संकेतस्थळ पाहता येते. त्याचे दुवेही ते देतात. अनेक संकेतस्थळांवर मोफत सॉफ्टवेअर असतात. त्याविषयीही ते माहिती पुरवतात. किंवा एखादी फॉंट पुरविणार्‍या संकेतस्थळाचीही ते शिफारस करतात. थोडक्यात जालावर भटकंती करताना कवडीही न खर्चता मोफत अनेक बाबी मिळतात तेही या ब्लॉगवर गेल्यानंतर कळते.

शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संगणकविषयक अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतात. रोजचे काम करताना त्या अतिशय उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ तुम्हाला ई मेलमधून मोठी फाईल पाठवायची आहे. पण सामान्यपणे ई मेलमधून फाईल पाठविण्याची क्षमता दहा एमबी असते. पण त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची तर काय करावे लागेल? शिरवळकरांच्या ब्लॉगवर त्याचे उत्तर आहे.

असा हा माहितीच्या कक्षा रूंदावणारा ब्लॉग. जालावर भटकंती करताना या ब्लॉगवर भेट दिल्यानंतर बाहेर पडताना नक्कीच समृद्ध झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अस्सल नेटकर या ब्लॉगला टाळून पुढे जात नाहीत. मग शिरवळकरांना भेटताय ना?

ब्लॉगचे नाव - संगणक जगत अर्थात Madhav Shirvalkar's info
ब्लॉगर- माधव शिरवळकर, मुंबई
URL - http://sanganaktoday.blogspot.com

वेबदुनियाचे नवीन सदर ब्लॉग कॉर्नर

Share this Story:

Follow Webdunia marathi