Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फुलपाखरांची रंगबिरंगी दुनिया

फुलपाखरांची रंगबिरंगी दुनिया
PRPR
मराठीचं साहित्यविश्व जसे विविध विषयांनी समृद्ध आहे, तसेच मराठी ब्लागविश्वही समृद्ध होत चालले आहे. ब्लॉग हा केवळ मनाच्या भावना उतरवून ठेवणारी अनुदिनी उरलेली नसून तिला मोठे माहितीमुल्य आणि उपयोगमुल्यही आले आहे. एखाद्या स्वतंत्र वेबसाईटमध्ये असलेली उपयुक्तता त्यात आहे. आज आम्ही अशाच एका ब्लॉगची ओळख आपल्याला घडविणार आहोत. हा ब्लॉग अतिशय वेगळ्या प्रकारची माहिती देणारा तर आहेच, शिवाय त्यातील छायाचित्रांनी तो अतिशय देखणाही झालेला आहे.

webdunia
PRPR
'युवराजबरोबर निसर्ग निरिक्षण' असे या ब्लॉगचे नाव. संपूर्णपणे फुलपाखरू या विषयाला वाहिलेला हा ब्लॉग अतिशय देखण्या छायाचित्रांनी सजला आहे. ठाण्यात रहाणारे युवराज गुर्जर हे या ब्लॉगचे लेखक. केवळ फुलपाखरू या विषयावर असलेला हा मराठीतील हा एकमेव ब्लॉग असावा. भारतीय भाषांतही या विषयावर ब्लॉग असण्याची शक्यता कमी आहे.

webdunia
PRPR
युवराज हा माणूस मुळातच निसर्गवेडा आहे. म्हणूनच वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊनही तिथल्या आकडेमोडीत ते रमले नाहीत. हिरव्या रंगाची भूल त्याला फार आधीपासूनच पडलेली. म्हणूनच ठाण्याचं येऊरचं जंगल असो की मुंबईतलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. युवराजनी ते पायी घातलंय. निसर्गात फिरतानाही रंगबिरंगी फुलपाखरे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. या फुलपाखरांचे सुंदर फोटो घेणे, त्यांच्याविषयीची माहिती जमविणे याची त्यांना फार आधीपासूनच सवय लागलेली. ही माहिती जमवली तरी ती लोकांपर्यंत पोहोचायला हवी ही त्यांची कळकळ होती. म्हणूनच १९९४ मध्ये त्यांनी फुलपाखरांवर पुस्तक लिहिलं. फुलपाखरांवर लिहिलेलं मराठीतील हे पहिलं पुस्तक.

या लेखनानंतर युवराज यांची लेखन मुशाफिरीही सुरू झाली. टाईम्स ऑफ इंडियासारख्या बड्या दैनिकांमधूनही त्यांनी या विषयावर लिहिले. लोकप्रभा या नामवंत साप्ताहिकामधूनही त्यांचे लेखन लोकांपर्यंत जात आहे. प्रसिद्धीच्या एवढ्या विविध वाटा असतानाही, महाजालावर मात्र मराठीतून या विषयावर माहिती नाही, या कळकळीपोटी त्यांनी २००६ मध्ये ब्लॉग सुरू केला.

webdunia
PRPR
या ब्लॉगमध्ये फुलपाखरांविषयी काय नाही? विविध जातीच्या फुलपाखरांविषयी माहिती त्यात आहे. प्रामुख्याने आपल्या देशात सापडणार्‍या फुलपाखरांबरोबरच इतर देशातही ती कुठे आढळतात ही माहितीही त्यात आहे. फुलपाखरांच्या जातीबरोबर ती कुठल्या उपजातीतील फुलपाखरे आहेत? त्यांचे शास्त्रीय नाव, त्याचे वर्णन, त्यांची संख्या, त्यांचा आढळ, त्यांच्या सवयी यांचे अतिशय मनोरम वर्णन युवराज अगदी साध्या, सोप्या आणि अनलंकृत भाषेत करतात. त्यामुळे माहिती शास्त्रीय असूनही ती वाचायला बोजड किंवा रसहीन अशी वाटत नाही. उलट मजा येते.

युवराज यांचे निरिक्षणही फार सूक्ष्म आहे. लेखनात अनेकदा रंजक माहिती ते देतात. सिल्व्हरलाईन नावाच्या जातीचे फुलपाखरू खोटे डोके दाखवून स्वतःचा बचाव कसे करते, याविषयीची माहिती ज्ञानात भर घालते. अनेकदा लिहिता लिहिता युवराज अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला देऊन जातात. उदा. जगात ब्लू नावाच्या फुलपाखरांची जात सर्वांत मोठी आहे. भारतात या जातीच्या फुलपाखराच्या ४५० उपजाती आढळतात. किंवा स्वालोटेल्स या जातीतील बर्डविग हे फुलपाखरू जगातील सर्वांत मोठे फुलपाखरू आहे. फुलपाखरांच्या वर्णनाबरोबरच ही माहिती या लेखानेच संदर्भमुल्य वाढविते.

webdunia
PRPR
फुलपाखऱासारख्या इवल्या जीवाच्या आयुष्यातही एवढे 'रंग' आहेत हे पाहून ते रंग टिपणार्‍या युवराज यांचे उलट कौतुकच वाटते. 'लार्ज ओक ब्लू'पासून तर अगदी 'पीकॉक पॅन्सी'पर्यंतचा हा फुलपंखी लेखन प्रवास झालेला आहे.

webdunia
PRPR
आपल्या या छंदापायी येऊर, संजय गांधी उद्यानांव्यतिरिक्त युवराज देशातील इतर जंगलातही फिरले आहेत. नुकतेच ते अरूणाचल प्रदेशातही जाऊन आले. याशिवाय दक्षिणेतही त्यांची याच छंदापायी फिरस्ती झालेली आहे. कान्हा, बांधवगड या अभयारण्यातही त्यांचे येणे जाणे असतेच. थोडक्यात या छंदासाठी त्यांनी अनेक जंगले पायी घातली आहेत.

या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेले सुंदर फोटो. युवराज स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणूनच एवढे सुंदर फोटो त्यांनी दिले आहेत. शिवाय या फुलपाखरातलं नेमकं सौंदर्य काय याची जाणीवही त्यांना असल्यामुळे तो अँगल त्यांनी बरोबर टिपला आहे. त्यामुळे हा ब्लॉग माहितीबरोबरच नेत्रसुखदही झाला आहे. शेजारीच माहिती गुंफल्याने त्यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये फोटोत पहाताही येतात. त्यामुळे माहितीची मजा आणखी वाढते.

webdunia
PRPR
फुलपाखरू एवढेच काही युवराज यांचे प्रेम नाही. ते मुळात निसर्गप्रेमीच असल्याने त्या जगातील प्रत्येक स्पंदनाशी त्यांचे नाते आहे. फुलपाखरांबरोबर इतरही पक्षी, प्राण्यांची त्यांच्याकडे माहिती आहे. याविषयीचे स्लाईड शोही ते सादर करत असतात. आता या फुलपाखरांची वेबसाईट तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. केवळ फुलपाखरू या विषयाला वाहिलेली कदाचित ती भारतीय भाषांतील पहिलीच वेबसाईट ठरेल.

आणखी एक महत्त्वाची बाब. युवराज यांच्या ब्लॉगला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. ब्लॉगवरील लेखाखाली दिलेल्या कॉमेंटवरून तर ते कळतेच. पण या लेखांचा उपयोग करून ठाण्यातील एका शाळेच्या विद्यार्थिनीने एक प्रोजेक्टही केला होता. याशिवाय अनेक जण त्यांच्याशी फोन, इमेल द्वारे संपर्क साधत असतात. युवराज यांनी वेबवर खुला केलेला खजिना खरोखरच सार्थकी लागतोय असे म्हटल्यास वावगे ठऱणार नाही.

ब्लॉगचे नाव - युवराज बरोबर निसर्ग निरीक्षण
ब्लॉगर- युवराज गुर्जर, ठाणे (महाराष्ट्र) - संपर्क- ९८९२१३८३३८

ब्लॉगचा पत्ता- http://nature-observations-with-yuwaraj.blogspot.com

पांढर्‍यावरचं काळं

Share this Story:

Follow Webdunia marathi