मराठी ब्लॉगविश्वातील विविध विषयांवर असलेले ब्लॉग पाहून कधी कधी चकित व्हायला होते. म्हणूनच हे विश्व खूपच समृद्ध होत चालले आहे, असे जे म्हटले जाते, ते फुकाचे नाही, याची खात्री पटते. मागे एकदा फुलपाखरांवरचा ब्लॉग आपण पाहिला. यावेळी मराठी गाण्यांना वाहिलेल्या ब्लॉगची ओळख करून देण्यासाठी हा लेखप्रपंच.
केवळ गाण्यांचा संग्रह हा ब्लॉगचा विषय होतो, ही बाबच मुळात स्पृहणीय आहे. अनेकदा आपण गाणी ऐकतो, पण सर्व गाणी पाठ नसतात. अनेकदा त्याचे नेमके शब्द माहित नसतात. त्यामुळे आपण केवळ चालीचा, त्याच्या संगीताचा आनंद घेतो. शब्दांचा आनंद घेऊ शकत नाही. त्याचा अर्थ समजून घेऊन गाणे मनात रूजविण्यात अडथळा येतो. मराठी गाण्यांप्रती जिव्हाळा, आवड असलेल्या मिलिंद दिवेकर यांनी अतिशय कष्ट घेऊन या गाण्यांची मैफल रसिकांसाठी सादर केली आहे. या ब्लॉगवर गेल्यानंतर आपल्याला छान छान गाण्यांचा शाब्दीक आस्वाद घेता येतो. गाण्यांचे शब्द वाचता वाचताच, आपण कधी गुणगुणू लागतो ते कळतही नाही.
दिवेकरांच्या या गानसत्राची सुरवात गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला झाली, ती लळा जिव्हाळा शब्दच खोटे या गाण्याने. यानंतर सुरू झालेला हा सुरेल प्रवास यापुढे बहरत गेला आहे. आतापर्यंत या ब्लॉगमध्ये २१० गाणी झाली आहेत. या गाण्यातही कुठला भेदभाव दिवेकरांनी केलेला नाही. सर्व रसांची गाणी यात आहेत. प्रसिद्ध, अप्रसिद्ध गाणी तर आहेत. पण सुमधूरता व काव्यविशेषता असलेली गाणी हा प्रामुख्याने गाणी निवडण्याचा निकष असल्याचे जाणवते.
मराठी गाणी हा दिवेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचे त्यांनी गोळा केलेल्या गाण्यातील वैविध्य पाहून लक्षात येते. म्हणूनच अगदी जुन्या काळातील अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाट्यपदापासून ते अगदी आताच्या काळातील अगदी संदीप खरेची गाणी येथे आहेत. मराठी माणसाचा वीक पॉईंट म्हणता येईल अशी, घेई छंद मकरंद, हे सूरांना चंद्र व्हा किंवा दिव्य स्वातंत्र्यरवी आत्मतेजोबले प्रकटला, ही नाट्यगीते त्यांनी मर्मबंधातील ठेवीप्रमाणे जपून ठेवली आहेत.
याशिवाय इतर लोकप्रिय, प्रसिद्ध गाणीही येथे आहेत. पण त्याचबरोबर अनेक दुर्मिळ गाणीही वाचायला मिळतात. जुन्या काळातील मंडळींच्या अजूनही लक्षात असलेले खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या हे वि. भा. पाठकांचे गाणेही येथे आहे. अनेकांना गाणे माहित असेल, पण त्याचे कवी व गाण्याचे पूर्ण शब्द माहित नसतील. काही गाणी आजच्या पिढीला माहितही नसतील अशी आहेत. उदा. भर उन्हात बसली धरून सावली गुरं हे १९६० सालच्या उमज पडेल तर या चित्रपटातील गाणं किंवा राजा बढेंनी लिहिलेले आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेली कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना ही लावणी.
दिवेकरांच्या ब्लॉगचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ गाणी देऊनच ते थांबले नाहीत, तर त्याचे गायक कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण आणि संबंधित नाटक, चित्रपट कोणता हेही त्यांनी दिले आहे. त्यामुळे वाचकाला परिपूर्ण माहिती मिळते. अगदी सांग सांग भोलानाथ हे गाणं आज अबालवृद्धांच्या ओठावर आहे. पण त्याचं संगीत लतादिदींच्या भगिनी मीना खडीकरांनी दिले आहे व रचना, योगेश खडीकर व शमा खळे यांनी गायलंय ही माहिती येथे आल्यावर कळते. शाळा सुटली पाटी फुटली आई मजला भूक लागली हे नाशिकच्या योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेले व गाजलेले बालगीत कुंदा बोकिल- भागवतांनी गायले आहे, हे वाचून नवीन माहिती मिळते.
पूर्वीच्या काळी गाणी लिहिलेले कागद मिळायचे. त्यावर ही सर्व माहिती गाण्यासह दिलेली असायची. हा ब्लॉग पाहून अगदी त्याचीच आठवण येते. दिवेकरांनी वाचकांच्या सोयीसाठी अ ते ज्ञ अशा आद्याक्षरांमध्येही गाणी विभागली आहेत. त्यामुळे केवळ आद्याक्षरावरूनही गाणी शोधता येतात.
या शिवाय आधुनिक वाल्मिकी अशी सार्थ उपाधी दिलेल्या गदिमांच्या लेखणीतून उतरलेले गीत रामायणही दिवेकरांनी येथे लिखित स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. दिवेकरांच्या या सुरेल प्रवासात त्यांना इतरांकडूनही मदत मिळते. म्हणूनच मराठी गाण्यांच्या या गानकोशात इतरांनीही आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन ते करतात. मग, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार ना?
ब्लॉग - मराठी चित्रपटातील गाणी
ब्लॉगर - मिलिंद दिवेकर
ब्लॉगचा पत्ता- http://chitrapatgeet.blogspot.com/