पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलमध्ये १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय झाला. या पाठोपाठ आता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील टोलमध्येही १८ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तीन वर्षांची ही एकत्रित वाढ करण्याचा हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास आणखी महागणार आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाढीव टोलदर १ एप्रिलपासून लागू होणार आहे. याच महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्याच्या विरोधात १४ मार्चला स्थानिक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी सरकारने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर दोनच आठवड्यांत सरकारने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे. केवळ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरच नव्हे, तर जुन्या महामार्गावरील प्रवासही महागणार आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्ग टोलचा दर
वाहन जुना टोल नवीन टोल
मोटार १३५ १५६
हलके वाहन २४० २७७
मालमोटार/बस ४७६ ५५१
अवजड वाहन १०२३ ११८४
स्थानिक नागरिकांसाठी टोलचा दर
वाहन जुना टोल नवीन टोल
मोटार ४१ ४७
हलके वाहन ७२ ८३
मालमोटार/बस १४३ १६५
अवजड वाहन ३०७ ३५५
Edited by : Ratnadeep Ranshoor