सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला कोणत्याही प्रकारे दिलासा देण्यास नकार दिल्याने अॅम्बी व्हॅलीची लिलाव प्रक्रिया 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे पार पडणार आहे. न्यायालयाने या लिलाव प्रक्रियेमध्ये बदल करण्यास नकार दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांनी न्यायलयाने सांगितलेली 1500 कोटी रूपयांची रक्कम सेबी-सहाराच्या खात्यात जमा न केल्याने सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष खंडपीठाने या लिलावाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये अॅम्बी व्हॅलीचा लिलाव होणार आहे.
या लिलाव प्रक्रियेत अधिक बोली लावणार्या तीन जणांना 17 ऑक्टोबर रोजी ईमेलद्वारे माहिती देणार आहे. त्यानंतर यशस्वी बोली लावणार्याला 16 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे.
खंडपीठाने नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या सहारा प्रमुखांच्या विनंतीला नकार दिला. याप्रकरणी खंडपीठाने म्हटले की सहाराप्रमुखांद्वारे दिलेल्या 11 नोव्हेंबर 2017 या तारखेचे पोस्ट डेटेड चेक्सचा स्वीकार करणे न्यायाशी प्रतारणा केल्यासारखे होईल. असे करणे हे कायद्याशी खेळणार्या व्यक्तीप्रती दयाभाव दाखवल्यासारखे आहे.