येत्या काळात भारतात आग पेटवणेही महाग होईल. कारण तब्बल 14 वर्षांनंतर काडीपेट्यांची किंमत दुप्पट होणार आहे.
मॅचबॉक्सची किंमत वाढवण्याचा निर्णय ऑल इंडिया चेंबर ऑफ मॅचेसच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला 5 प्रमुख मॅचबॉक्स उद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत काडीपेट्यांची किंमती वाढवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
आत्तापर्यंत बाजारात एक रुपयाला काडीपेटी उपलब्ध होत्या, पण 1 डिसेंबरपासून यांच्या किंमतीत वाढ होऊन 2 रुपयांपर्यंत जाईल, म्हणजेच किंमत दुप्पट होणार.
कच्च्या मालाचे भाव वाढले असल्याने मॅचबॉक्सच्या किमती वाढवणे गरजेचे बनले असल्याची चर्चा बैठकीत झाली. मॅचबॉक्स बनवण्यासाठी मुख्यतः लाल फॉस्फरस, मेण, बॉक्स बोर्ड इत्यादी आवश्यक असतात. डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक महाग झाली असल्याने माचीस बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा मालही महाग झाला आहे.