वाईन विक्रीच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. इतरही अनेकांनी या निर्णयाला विरोध केला. तशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या वाईन संदर्भातील निर्णयावर महत्त्वाचे विधान केले. वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा फार चिंतेचा विषय नाही. पण जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी याबद्दलची माहिती दिली. तसेच, महाराष्ट्रात भाजपचेच लोक सर्वात जास्त दारूडे असल्याचं विधानही त्यांनी केलं.
महाराष्ट्रात सुपर मार्केटने वाईन विक्रीसाठी ठेवण्याचा जो निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता, त्या निर्णय़ाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. भाजपाचे लोक यावर बरीच चर्चा करताना दिसत आहेत. भाजपाने काही प्रश्नांची उत्तर द्यावीत की भाजपाच्या नेत्यांचे वाईन शॉप महाराष्ट्रात आहेत की नाहीत? अनेक माजी मंत्र्यांचे बार आहेत की नाहीत? काही केंद्रीय मंत्र्यांचे महाराष्ट्रात बार आहेत की नाही? या सर्वांना भाजपा सांगणार का की हे परवाने सरेंडर करा आणि आजपासून दारू पिणं बंद करा, असा नवाब मलिक म्हणाले.
महाराष्ट्रात सर्वात जास्त दारूच्या दुकानांचे परवाने आणि इतर दारूसंबंधीच्या गोष्टींमध्ये भाजपच आघाडीवर आहे. मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात भाजपाचेच लोक सर्वात जास्त दारूडे आहेत. भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचं मद्यराष्ट्र होऊ देणार नाही. मग मध्य प्रदेश पॉलिसी पाहता त्याचं नाव मद्य प्रदेश ठेवायचं का? त्या राज्यात नवीन प्रकारची दारू बनवण्यास परवानगी देण्यात आली असून त्यावर उत्पादन शुल्कही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आधी त्याबद्दल बोलावं, असा सणसणीत टोला मलिकांनी भाजपला लगावला.