सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे दिवाळीपूर्वी खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळापासून महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अदानी विल्मर आणि रुची सोया इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्य तेल कंपन्यांनी घाऊक दरात 4-7 टक्क्यांनी कपात केली आहे. इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने माहिती दिली की, इतर कंपन्यांही अशाचप्रकारे खाद्यतेलाच्या दरात कपात करू शकतात.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सरकारी उपाययोजनांमुळे पाम तेलाची सरासरी किरकोळ किंमत 31 ऑक्टोबर रोजी 21.59 टक्क्यांनी घसरून 132.98 रुपये प्रति किलो झाली आहे, जी 1 ऑक्टोबर रोजी 169.6 रुपये प्रति किलो होती. सोया तेलाची सरासरी किरकोळ किंमत या कालावधीत 155.65 रुपये प्रति किलोवरून किरकोळ कमी होऊन 153 रुपये प्रति किलो झाली आहे.
SEA ने सांगितले की, शुल्क कमी केल्यामुळे पामोलिन, रिफाइंड सोया आणि रिफाइंड सूर्यफूल यांच्या घाऊक किमती 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान 7-11 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. या सर्व खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत लक्षणीय वाढ झाली असली तरी सरकारने शुल्कात कपात केल्याने त्याचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी झाला आहे, असे एसईएने म्हटले आहे.
इंडोनेशिया, ब्राझील आणि इतर देशांमध्ये जैवइंधनाकडे वळल्यानंतर खाद्यतेलाच्या कमी उपलब्धतेमुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतीही आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीच्या अनुषंगाने वाढल्या आहेत. भारत आपल्या खाद्यतेलाच्या ६० टक्क्यांहून अधिक मागणी आयातीद्वारे पूर्ण करतो. जागतिक किमतीतील कोणत्याही वाढीचा थेट परिणाम स्थानिक किमतींवर होतो.