नाशिक (प्रतिनिधी): येवला तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
विशेषता काढणीला आलेला तसेच काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरवला आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात आसू आले आहेत.
दिवसभर वातावरणात उष्णता होती, मात्र रात्री नऊच्या सुमारास जोरदार वादळ आले. वादळाची तीव्रता इतकी होती, की शहरातील क्रीडा संकुल येथे मोठे झाड उन्हाळून पडले. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय अनेकांनी झाकलेल्या कांद्याच्या पोळीवरील कागदही उडून गेले.
सध्या उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असून शेतकऱ्यांनी पोळी घालून ठेवलेल्या आहेत. अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरलेला नाही. या पावसामुळे असा उघड्यावर असलेला कांदा ओला झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
काही शेतकऱ्यांनी शेतातच कांदा काढून ठेवलेला होता, हा कांदा देखील ओला होऊन खराब झाल्याने आता साठवण्याच्या दर्जाचा राहिला नाही. परिणामी मिळेल त्या भावात हा कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
ग्रामीण भागातील वीजपुरवठा थंडीत झालाच परंतु शहरात देखील सुमारे तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित असल्याने रात्री उशिरापर्यंत सुरळीत पुरवठ्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागली. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor