होंडा कार्स इंडियाने आपल्या 65 हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. 2018 मध्ये मॅन्युफॅक्चर केलेल्या 65,651 कार कंपनीने परत मागवल्या आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे गाड्या ‘रिकॉल’ करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
ग्राहकांकडून फ्युअल पंपमध्ये दोष असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीने गाड्या परत मागवल्या आहेत. 20 जूनपासून दोष असलेल्या गाड्या परत मागवण्यास सुरूवात होणार आहे. तांत्रिक दोष दूर करुन ग्राहकांना गाड्या परत केल्या जातील, यासाठी ग्राहकांकाडून पैसे आकारले जाणार नाहीत असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
होंडाने दिलेल्या माहितीनुसार, 16 हजार 434 ‘होंडा सिटी’ कार आणि 32 हजार 498 ‘Amaze’ कार परत मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय कंपनीने 7 हजार 500 ‘जॅझ’ कार , 7 हजार 57 ‘WR-V’ कार, 1622 ‘BR-V’ कार, 360 ‘Brio’ कार आणि 180 ‘CR-V’ कार परत मागवल्या आहेत. होंडा कार्स इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कारमालकाला घरबसल्या त्याच्या गाडीत दोष आहे की नाही, याबाबत माहिती मिळेल. तसेच, जर गाडीमध्ये दोष असेल तर त्याबाबत ‘ऑनलाइन रिक्वेस्ट’ करता येईल.