मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. तर १८ वर्षांखालील मुलांना आपलं वयाचा पुरावा म्हणून आपल्या फोटोसहीत असलेलं ओळखपत्र दाखवणं आवश्यक असल्याचा सुधारित आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्या आल्याने मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मॉल्स आणि हॉटेल सुरु करण्यात आले असून रात्री १० वाजेपर्यं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. ज्या नागरिकांनी दोन लसीचे डोस घेतले आहेत. अशा नागरिकांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.
राज्य सरकारने आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या निर्बंधांत मोठी शिथिलता देण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात मॉल रोज रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली होती. या आदेशात सुधारणा केली आहे. तसेच, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासोबत फोटोसहीत असलेले ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील असे स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्य सरकारच्या “सुधारित आदेशानुसार वय वर्ष १८ खालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने वय वर्ष १८ खालील वयोगटातील मुला आणि मुलींना मॉल मध्ये प्रवेश करताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील”, असा आदेश जारी करण्यात आला आहे.