Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कनिका टेकरीवाल 33 व्या वर्षी भारतातल्या श्रीमंत महिलांच्या यादीत अशा पोहचल्या

kanika tekariwal
, शुक्रवार, 29 जुलै 2022 (16:52 IST)
देशातील टॉपची आयटी कंपनी असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. तेच दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधलं करिअर सोडून नायका नावाचा ब्युटी ब्रँड सुरू करणाऱ्या फाल्गुनी नायर, स्वतःच्या बळावर श्रीमंत झालेल्या महिलांमध्ये टॉपला आहेत.
 
कोटक प्रायव्हेट बँकिंग-हुरुनने बुधवारी भारतातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी जाहीर केली. 31 डिसेंबर 2021 पर्यंत महिलांच्या एकूण संपत्तीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
 
रोशनी नाडर यांच्या एकूण संपत्तीत 54 टक्क्यांनी वाढ होऊन ती आता 84 हजार 330 कोटी इतकी झाली आहे. तेच 59 वर्षीय फाल्गुनी नायर यांची एकूण संपत्ती 57 हजार 520 कोटी इतकी आहे. या अहवालानुसार नायर यांच्या संपत्तीत 963 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
या यादीत भारतात जन्मलेल्या आणि वाढलेल्या तसंच कौटुंबिक व्यवसाय चालवणाऱ्या किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या 100 महिला व्यावसायिकांना स्थान देण्यात आलं आहे.
 
सर्व 100 महिलांच्या संपत्तीत एका वर्षात 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020 मध्ये ही संपत्ती 2.72 लाख कोटी होती. तेच 2021 मध्ये या संपत्तीत वाढ होऊन 4.16 लाख कोटी इतकी झाली आहे. विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये या महिलांचा वाटा 2 टक्के इतका आहे.
 
यादीत कोणाला मिळालं स्थान
सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर रोशनी नाडर, दुसऱ्या क्रमांकावर फाल्गुनी नायर तर तिसऱ्या क्रमांकावर बायोकॉनच्या संस्थापक आणि सीईओ किरण मुझुमदार आहेत.
 
यानंतर डीवी लॅबोरेटरीजच्या संचालिका नीलिमा मोतापर्ती, जोहोच्या संस्थापिका राधा वेंबू, यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड फार्मस्यूटिकल्सच्या चेअरपर्सन लीना गांधी तिवारी, थरमॅक्सच्या संचालक अनु आगा आणि मेहर पदमजी, डेटा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म न्यू कॉन्फ्लुएंटच्या सहसंस्थापक नेहा नरखेडे, डॉ लाल पॅथलॅब्सच्या संचालक वंदना लाल आणि हिरो फिनकॉर्पच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू मुंजाल यांचा पहिल्या दहा श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश आहे.
 
मात्र, या टॉप टेन यादीत कनिका टेकरीवाल हे एक नाव नाहीये, पण त्यांची जोरदार चर्चेत आहे.
 
खरं तर कनिका टेकरीवाल हे नाव कमी वय असणाऱ्या सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीत टॉपला आहे.
 
भारतातील श्रीमंत महिलांची यादी
रोशनी नादर मल्होत्रा - एचसीएल टेक्नॉलॉजी - 84,330 कोटी
फाल्गुनी नायर - नायका - 57,520 कोटी
किरण मुजुमदार शॉ - बायोकॉन - 29,030 कोटी
नीलिमा मोतापर्ती - डीवी लॅबोरेटरीज - 28,180 कोटी
राधा वेंबू - जोहो - 26, 260 कोटी
लीना गांधी तिवारी - यूएसव्ही प्रायव्हेट लिमिटेड- 24,280 कोटी
अनु आगा आणि मेहर पदमजी - थरमॅक्स - 14,530 कोटी
नेहा नरखेडे - न्यू कॉन्फ्लुएंटच्या - 13,380 कोटी
वंदना लाल -डॉ लाल पॅथलॅब्स - 6,810 कोटी
रेणू मुंजाल - हिरो फिनकॉर्पच्या - 6,620 कोटी
कोण आहेत या कनिका टेकरीवाल?
 
'जेट सेट गो' नावाची कंपनी सुरू करून कनिका टेकरीवाल यांनी पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय.
 
अवघ्या 33 वर्षांच्या कनिकाने एव्हिएशन क्षेत्रात असा उपक्रम सुरू केलाय. ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. कनिकाची कंपनी लोकांना प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर पुरवते. त्यांच्या कंपनीमार्फत प्रायव्हेट एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर आणि एअर अॅम्ब्युलन्स ऑनलाइन सहज बुक करता येतात.
 
'स्वतःवर विश्वास ठेवा' हा जीवनाचा मूलमंत्र मानून काम करणाऱ्या कनिका टेकरीवालच्या संपत्तीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 420 कोटी इतकी आहे.
 
दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत कनिकाने आपल्या आयुष्यातील आव्हानांविषयी सांगितलं. तिने वयाच्या 17 व्या वर्षी एका विमान कंपनीत काम केलं. तिथूनच तिला तिचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
 
जेव्हा कनिकाने 20व्या वर्षांत पदार्पण केलं तेव्हा तिला कॅन्सरने गाठलं. पण या आजाराशी लढता लढता ती पूर्वीपेक्षा कणखर झाली.
 
कनिका सांगते की, आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळाली तर लक्षात ठेवा ती अजूनही अर्धीच मिळाली आहे.
 
लोकांनी त्यांच्या बिझनेस आयडियाची खिल्लीही उडवली होती. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत कनिका म्हणाली, "वयाच्या 24 व्या वर्षी मी एकटीने कंपनी सुरू केली. मी नाव बदलून ग्राहकांशी बोलायचे. हळूहळू माझी कंपनी मोठी व्हायला लागली."
 
एक निष्काळजी विद्यार्थिनी ते श्रीमंत महिला असा प्रवास करणाऱ्या फाल्गुनी नायर
'सेल्फ मेड' अशा श्रीमंत महिला उद्योगपतींमध्ये फाल्गुनी नायर यांचं नाव आघाडीवर आहे. लहानपणी मात्र फाल्गुनीच्या मनात असा कोणताही विचार नव्हता.
 
यावर्षी महिला दिनानिमित्त आयोजित चॅट शोमध्ये नायर यांनी आपल्याविषयीचा एक किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, मेहनत न करता चांगली शाळा मिळाली म्हणून मी अभ्यासाबाबत बेफिकीर झाले. माझ्या आयुष्यात कोणतंही ध्येय नव्हतं.
 
गेल्या वर्षी, फाल्गुनी नायर यांचा ब्युटी स्टार्ट-अप नायकाच्या शेअर्सची मार्केटमध्ये ब्लॉकबस्टर अशी सुरुवात झाली होती.
 
फाल्गुनी नायर यांनी 2012 मध्ये नायकाची सुरुवात केली. त्यावेळी कंपनीने ब्युटी प्रोडक्ट्स सोबत बाजारात एन्ट्री मारली. पण आता नायकावर फॅशनशी संबंधित बऱ्याच गोष्टी मिळतात.
 
आपल्या घरच्या वातावरणाविषयी फाल्गुनी सांगतात, "माझी आई आम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्यायची. आम्ही 99 मार्क्स मिळवले तर घरी सेलिब्रेशन करण्याऐवजी, एक मार्क कुठे आणि कसा गेला याविषयी विचारलं जायचं. त्यामुळेच मी नेहमी काहीतरी चांगलं करावं अशी भावना होती. भगवद्गीतेचा आमच्या कुटुंबावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मी नेहमी परिणामांची चिंता न करता काम करत राहिले."
 
हुरुनच्या यादीत येण्यासाठी पूर्वी 100 कोटींची संपत्ती असावी लागायची. पण आता यावर्षी ज्यांची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे त्यांनाच स्थान देण्यात आलंय. टॉप 10 महिला व्यावसायिकांमध्ये हा कट ऑफ 6,620 कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ 10 टक्क्यांनी वाढला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Commonwealth Games 2022: टीम इंडियासमोर काय आव्हान असणार ? पाकिस्तानशीही स्पर्धा होईल, वेळापत्रक आणि सर्वकाही जाणून घ्या