घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
'कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सूट दिली जाणार आहे. १ सप्टेंबरला १ वाजता रजिस्ट्रेशन सुरू ठेवणार आहो. रियल इस्टेट क्षेत्राला याचा फायदा होईल आणि गती येईल', असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
शहरी भागांमध्ये सध्या ५ टक्के स्टॅम्प ड्युटी घेतली जात आहे, आता १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत २ टक्के, तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत ३ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. ग्रामीण भागात सध्या ४ टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात आहे. त्याऐवजी १ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत १ टक्के आणि १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के स्टॅम्प ड्युटी घेण्यात येईल.