मुकेश अंबानींची संपत्ती नऊ राज्यांच्या जीडीपीइतकी

सोमवार, 13 जुलै 2020 (07:39 IST)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सातवे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तत्पूर्वी एप्रिल २०२०मध्ये जाहीर झालेल्या यादीनुसार अंबानी २१व्या क्रमांकावर होते. १० जुलै रोजी त्यांची एकूण संपत्ती ७०.१० अब्ज डॉलर अर्थात ५.२५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. फोर्ब्जच्या रिअल टाइम बिलेनिअर्सच्या यादीत अंबानी यांनी बर्कशायर हॅथवेचे वॉरन बफे, गुगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना मागे टाकले.
 
जगातील दहा सर्वांत श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी केवळ एकमेव भारतीयच नव्हे, तर आशियातीलही एकमेव व्यक्ती ठरले आहेत. अंबानी यांच्याकडे सध्या असणारी संपत्ती देशातील नऊ राज्यांच्या एकूण जीडीपीइतकी आहे. या नऊ राज्यांचा एकूण जीडीपी ५.३१ लाख कोटी रुपयांवर जातो.
 
पाच वर्षांत संपत्तीत साडेतीनपट वाढ
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबर २०१६मध्ये जिओ या नावाने दूरसंचार उद्योगात प्रवेश केला. तत्पूर्वी मार्च २०१६मध्ये अंबानी यांची एकूण संपत्ती १९.३ अब्ज डॉलर होती. त्यानंतरच्या पाच वर्षांत अंबानी यांची एकूण संपत्ती ५० अब्ज डॉलरवर (जवळपास ३.८६ लाख कोटी रुपये)जाऊन पोहोचली.मार्च २०२०पासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये दुपटीहून अधिक वाढ दिसून आली आहे. २३ मार्चला रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग मुंबई शेअर बाजारात ८७५.७२ रुपये होती. १० जुलैला समभागाची किंमत वाढून १८८०.२० रुपये झाली. त्यामुळे अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. फोर्ब्जच्या मते जिओव्यतिरिक्त अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजचा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा व्यवसाय होय. या दोन्ही क्षेत्रांतून कंपनील वार्षिक ८८ अब्ज डॉलरचा (जवळपास ६.६८ लाख कोटी रुपये) महसूल मिळतो.नऊ राज्यांचा जीडीपी
 
राज्य जीडीपी (कोटी रुपयांत)
मिझोराम** १९,४५७
अरुणाचल प्रदेश** २२,०४५
मणिपूर** २३,९६८
नागालँड** २४,२८१
सिक्कीम* २६,७८६
त्रिपुरा** ४६,१३३
गोवा* ७७,१७२
जम्मू काश्मीर** १,३८,४८८
हिमाचल प्रदेश* १,५३,१८१
(** जीडीपीचे आकडे २०१७-१८चे)
(* जीडीपीचे आकडे २०१८-१९चे)
(स्रोत : केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय)

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा, काळा बाजार करतांना दोघांना अटक