लडाख भागातील गलवान खोऱ्यात देशाच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर देशभरातून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जातंय. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशवासियांसमोर प्रश्न उपस्थित केला आहे.
विकासाला चालना देण्यासाठी जगभरातून आयात करणे हे चूक नाही, मात्र गणेशमूर्तीही चीनमधून आयात करण्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गणेशमूर्तींची चीनमधून आयात करण्याची खरंच गरज आहे का, असा प्रश्नच त्यांनी मांडला आहे.
उद्योगांसाठी देशात उपलब्ध नसलेला कच्चा माल इतर देशांतून आयात करणे योग्यच आहे, त्यात चूक काहीही नाही, मात्र आश्चर्य तेव्हा वाटतं जेव्हा गणेशमूर्तीही चीनहून आयात केल्या जातात. मातीच्या मूर्तीही चीनमधून मागवणं खरंच गरजेचं आहे का?' असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय.
तामिळनाडूतील भाजपा कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनांना मदत होईल, त्यांची वाढ होईल, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, अशा वस्तू आयात करण्यात काहीही चुकीचे नाही परंतु, ज्या आयातीमुळे रोजगार उपलब्ध होत नाही, आर्थिक समृद्धता हाती लागत नाही, आत्मनिर्भर होण्यासाठी त्याचा वापर होत नाही किंवा भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा काहीही फायदा होत नाही, अशा गोष्टी आयात करणं टाळायला हवं असंही त्यांनी म्हटलंय.
गणेशमूर्ती मातीपासून बनवल्या जातात. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या मूर्ती स्थानिक मूर्तीकारांकडून आणि कुंभारांकडून आपण खरेदी करतो. परंतु, आज गणेशमूर्त्याही चीनमधून का आयात केल्या जात आहेत? अशी स्थिती का निर्माण झालीय. आपण देशातच मातीच्या मूर्त्या घडवू शकत नाही का?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
सोबतच साबण ठेवण्याचे डब्बे, प्लास्टिकच्या वस्तू, उदबत्त्या यासारख्या घरगुती वस्तूंच्या आयातीवर देखील त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. आयात करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन हे भारतातील लघू आणि मध्यम उद्योगही करतायेत. या प्रकारची उत्पादनं स्थानिक स्तरावर देशी कंपन्या किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग द्वारे खरेदी केल्या तर त्यामुळे आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळू शकेल, असंही त्यांनी म्हटलंय.