Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओवा – ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील एक व्यावसायिक पीक

ओवा – ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील एक व्यावसायिक पीक
, गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (09:05 IST)
शेती हा पारंपरिक तसेच आधुनिक असा व्यवसाय असून त्यामध्ये निरंतर बदल होत असतात. शेतीमध्ये सुध्दा इतर व्यवसायांप्रमाणे असणारी स्पर्धा तसेच बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थिती यास अनुसरून पिके, पीक व्यवस्था, प्रक्रिया व पणन यांमध्ये शेतकरी व कृषी क्षेत्रातील व्यावसायिक सतत सुधारणा करत असतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्यावसायिक पिकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘ विकेल ते पिकेल ‘ धोरण स्वीकारले आहे. ‘ विकेल ते पिकेल ‘ धोरणा अंतर्गत नाविन्यपूर्ण व स्पर्धात्मक पिकांना चालना देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून ‘ ओवा ‘ पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
 
ओवा हे कोरड्या हवामानात येणारे पीक आहे. यासाठी चांगल्या निचऱ्याची जमीन फायदेशीर असते. कोरडे हवामान, हलकी-मध्यम जमीन व कमी पाण्याची गरज असल्यामुळे ओवा पीक राजस्थान व गुजरात राज्यात अधिक प्रमाणात घेतले जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर-वैजापूर सारख्या तालुक्यात काही प्रमाणात ओवा लागवड करण्यात येते. राज्यात बुलढाणा-अकोला जिल्ह्यातील शेगाव व इतर तालुक्यात सुध्दा ओवा पीक घेतले जाते.
 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद द्वारे मागील काही वर्षात ओवा पिकाचा शास्त्रीय अभ्यास करुन ओवा पिकाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओव्याची पारंपरिक लागवड देशी बियाणे वापरुन केली जाते. जुनागढ कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ओव्याचे सुधारित बियाणे एए-19-1 आपल्या भागासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारे शिफारस करण्यात आले. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पा अंतर्गत सुध्दा ओवा पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र व आत्मा प्रकल्पाच्या प्रयत्नातून ओवा पिकाचे क्षेत्र काही प्रमाणात वाढून त्यात सातत्य राखले गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील या प्रकत्यांचा प्रचार होऊन मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये राज्यातील 19 जिल्ह्यात काही प्रमाणावर ओवा लागवडीचे प्रयत्न केले आहेत.
 
ओवा पिकाची लागवड टोकन पध्दतीने केली जाते व लागवडीचा योग्य कालावधी ऑगस्टचा तिसऱ्या व चौथ्या आठवडा असतो. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.के.के.झाडे यांच्या मते आपल्या भागात ओवा पिकाचा कालावधी 140-150 दिवस असून ओव्याचा चांगला फुलोरा येण्यासाठी थंडीची आवश्यकता असल्यामुळे थंडी पर्यंत झाड पक्क होण्यासाठी ऑगस्टची लागवड फायदेशीर ठरते. तसेच जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पेरलेल्या मुग किंव सोयाबीन पिकानंतर सुध्दा ओवा लागवड करता येते.
 
ओव्याचे बी आकारणाने खूप लहान असते त्यामुळे शेतकऱ्यांनी याविषयी दोन गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. लागवडीसाठी बोटांच्या चिमटीत बियाणे पकडून टोकन करावे लागते त्याकारणाने एकाचा ठिकाणी संख्येने खूप बिया पडू शकतात, तेव्हा शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक टोकन करावे. बी आकाराने लहान असल्यामुळे व उगवण होण्यास 10-12 दिवस लागत असल्यामुळे उगवण होण्यापूर्वी पाऊस झाल्यास बी मातीत दाबले जाऊन किंवा उघडे पडून वाया जाऊ शकते. त्यासाठी वातावरणाचा अंदाज घेवून लागवड करावी. लागवड केल्या जागेवर वरुन थोडी वाळू टाकली तर बी वाहून जाणार नाही. ओव्याच्या पिकाला कीड व रोगाचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून येतो, त्यामुळे व्यवस्थित उगवण होणे खूप महत्वाचे असते.
 
ओवा हा गाजराच्या जातीचा आहे. त्यामुळे ओव्याचे झुडूप गाजर, कोथिंबीर, जिरे, गाजर गवत या सारखेच दिसते आणि त्याच फुलोरा सुध्दा पांढऱ्या रंगाचा छोट्या छत्री सारखा दिसतो. फुले पक्क झाल्यावर त्यातून हलक्या चॉकलेटी रंगाची फळे तयार होतात, हेच या पिकाचे उत्पादन.
 
गंगापूर-वैजापूरच्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू ओव्याचे उत्पादन एकरी 5.00 क्विंटल पर्यंत घेतले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माहितीप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर ओव्याची लागवड केली होती, त्यांना एकरी 9.50 क्विंटल पर्यात उत्पादन घेतले. ऑक्टोंबर हीट दरम्यान्‍ मातीची ओल पाहून गरजेनुसार आणि पीक फुलोऱ्यात असतांना संरक्षित सिंचन देणे फायदेशीर ठरते असे अनुभवातून दिसून येते.
 
ओवा हे पारंपरिक कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. परंतु, मागील काही वर्षात संरक्षित सिंचनाच्या सहाय्याने पिकाची चांगली वाढ झाल्यामुळे वाढीव उत्पादन मिळाल्याचा अनुभव खूप महत्वाचा ठरतो. ओवा हे एक व्यावसायिक पीक म्हणून पुढे येत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संचलित कृषी विज्ञान केंद्राकडून संपूर्ण माहिती घेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ओवा पिकाची व्यावसायिक लागवड करावी.
 
ओव्याची काढणी व प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ओव्याची विक्री कच्च्या स्वरुपात होत असल्यामुळे काढणी पश्चात ओवा स्वच्छ करुन त्याचे व्यवस्थित पॅकींग केल्यास थेट विक्री करता येते. पारंपरिक पध्दतीमध्ये कापणी करुन खळ्यावर बडवून ओवा काढला जातो. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नेहमीच्या मळणीयंत्रणात बसविण्यासाठी वेगळी चाळणी विकसित केली आहे. त्यामुळे 6-8 दिवसांचे ओवा मळणीचे काम काही तासात करता येते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कामगिरी; मद्यसाठ्यासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त