पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा नव्या सत्रासाठी शुभारंभ केला. यावेळी भाजपच्या सदस्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितलं की काल झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने देशाची अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियन डॉलरची करण्याचा निश्चय केला आहे. या कार्यात सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
जितका मोठा केक असेल तितका मोठा तुकडा तुम्हाला मिळेल अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे असं मोदींनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की जितकी मोठी अर्थव्यवस्था असेल तितका लोकांना फायदा होईल हे लक्षात घेऊन देशाची अर्थव्यवस्था वाढवण्यास हातभार लावावा.
हे लक्ष्य गाठू शकणार नाही अशी टीका काही लोक करत आहेत. ते लोक व्यावसायिक निराशावादी आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे पण हे लक्ष्य आम्ही गाठूच शकत नाही असं ते कसं म्हणू शकतात असा प्रश्न मोदींनी केला.
सध्या आपण अन्न-धान्यासाठी स्वयंपूर्ण आहोत. भविष्यात जास्तीत जास्त निर्यात कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असं पंतप्रधान म्हणाले.
देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न निर्यात करण्याची व्यवस्था करण्यात येईल. शेतकरी जे काही करत आहे त्यात व्हॅल्यू अॅडिशन करून त्याचं उत्पन्न वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे.
गरीबी हा सद्गुण समजला जातो ही खेदाची बाब आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. गरीबीमध्ये लोकांना एक गौरव वाटतो, अभिमान वाटतो ही वाईट गोष्ट आहे. आपण ऐकलं असेल जेव्हा सत्यनारायणाची कथा सांगितली जाते तेव्हा म्हटलं जातं एका गावात एक गरीब ब्राह्मण होता. गरिबीमध्ये काय अभिमानाची गोष्ट आहे असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. गरिबी दूर व्हायला हवी की नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.
या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोदींनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी अर्थसंकल्पाबाबत भाष्य केलं. गरीब आणि श्रीमंत हे दोन्ही घटक नव्या भारत भूमीचे हात व्हावे असा प्रयत्न राहील असं मोदी म्हणाले.