आज 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'चा स्थापना दिवस. 'रिस्क है तो इश्क है' सारखी वेबसीरिजमधली वाक्यं असो, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची इमारत असो किंवा शिंग उचलून वर उडवायला तयार असलेल्या बैलाची प्रतिमा... शेअर मार्केट म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर हे चित्र येतं.
शेअर बाजारात देशातल्या विविध शहरांमधली स्टॉक एक्स्चेंज येत असले, तरी 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'च्या इमारतीला शेअर बाजार अशा नावाने ओळखलं जातं.
एकेकाळी शेअर बाजार हा फक्त श्रीमंत उच्च वर्गाने विचार करण्याचा विषय आहे, असं मानलं जाई.
कालांतराने हे चित्र बदलत गेलं आणि आता बहुतांश सर्वच वर्गातील लोकांनी आपली पावलं या दिशेने वळवलेली दिसतात.
या स्टॉक एक्सचेंजचा विकास कसा होत गेला हे पाहताना थोडा मुंबईच्या फोर्ट भागाचा विचार केला पाहिजे.
मुंबई फोर्ट आणि ग्रीन्स
एकेकाळी मुंबई किल्ल्याचा विकास इंग्लंडमधील एखाद्या शहराप्रमाणे करण्यात आला होता. फोर्टमध्ये व्यापार करणाऱ्या सर्व लोकांना राहाता येत होतं. म्हणजेच ज्यांना संरक्षणाची गरज आहे अशा सर्व लोकांना फोर्टमध्ये सामावून घेण्यात येई.
यामध्ये पारशी, गुजरातमधून आलेले खोजा मुस्लिमांसारखे समुदाय, पाठारे प्रभू, सोनार अशा समुदायांचा समावेश असे. बाकी जे व्यवसाय करत नाहीत ते फोर्टच्या बाहेर असत.
आजच्या 'एशियाटिक लायब्ररी'च्या इमारती समोर म्हणजेच हॉर्निमन सर्कल येथे मोठी विस्तीर्ण गवताळ जागा होती. त्याला ग्रीन्स असं म्हणत. अशा ठिकाणी व्यापारी जमत, त्यांची जनावरं चरत, तिथल्या विहिरीचं पाणी पिऊन विश्रांती घेत किंवा एकमेकांच्या भेटी आणि व्यवहार इथं होत असतं.
सुरुवातीच्या काळात अफू आणि नंतर कापसाचा व्यवहार मुंबईत वाढला. मुंबईत अशाच प्रकारच्या जागा कापसाच्या व्यापारासाठी होत्या. कॉटनग्रीन हे त्याचचं एक केंद्र होतं.
मुंबई शहराचे अभ्यासक आणि खाकी टूर्सचे प्रमुख भरत गोठोसकर यांनी स्टॉक एक्सचेंजच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बीबीसी मराठीला माहिती दिली.
ते म्हणाले, "हॉर्निमन सर्कलमधल्या एका वडाच्या झाडाच्या सावलीत 1850 च्या दशकामध्ये व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापाराला सुरुवात केली आणि इथंच स्टॉक एक्सचेंजच्या कल्पनेचा पाया रचला गेला. त्यानंतर काही काळ हे ट्रेडिंग फ्लोरा फाऊंटनच्या जवळ एके ठिकाणी होत असे. शेवटी ते आजच्या जागेवर येऊन स्थिरावलं."
हॉर्निमन सर्कल
गेल्या दीडशे वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या व्यापाराचा विकास वेगात झालेला दिसतो. त्याचा बहुतांश पाया फोर्टमधील या परिसरामध्ये रचला गेल्याचं दिसतं. हॉर्निमन सर्कल हे पहिलं 'बिझनेस डिस्ट्रिक्ट' म्हणून स्थापन केलं गेलं.
त्यापूर्वी आपल्या घराच्या बाहेर दुकान आणि आतमध्ये घर किंवा खाली दुकान आणि त्याच्यावर राहाण्याचं ठिकाण अशी संकल्पना होती. पण प्रवास करून एखाद्या ठिकाणी व्यवसाय करायचा अशी कल्पना नव्हती. या 'बिझनेस डिस्ट्रिक्ट'च्या निमित्ताने ती सुरू झाली.
1872 साली सध्याच्या हॉर्निमनच्या जागेवर बागेचं बांधकाम होऊन शेजारी विविध कार्यालयांची सुरुवात झाली.
मुंबईचे गव्हर्नर जॉन एलफिन्स्टन यांच्या नावाने ते ओळखलं जाऊ लागलं. त्याला एलफिन्स्टन सर्कल म्हटलं जाऊ लागलं. (यांच्याच नावाने मुंबईत रेल्वे स्टेशनही होतं, आता त्याला प्रभादेवी स्टेशन म्हणतात). बेंजामिन हॉर्निमन यांच्या नावाने हे सर्कल आता ओळखलं जातं.
कॉटन बूम
मुंबईतल्या ट्रेडिंगला सर्वात चांगले दिवस आले ते म्हणजे कापसाच्या निर्यातीला चांगले दिवस आल्यानंतर. त्याला कॉटन बूम असंही म्हटलं जातं.
1860 च्या काळामध्ये अमेरिकन यादवी युद्धामुळे इंग्लंडमधील कापड गिरण्यांना कापूस मिळेनासा झाला. ती गरज मुंबईतून भागवण्यात आली.
तोपर्यंत रेल्वेची सुरुवातही झाली होती. या सर्व पोषक स्थितीचा फायदा झाला. मुंबईतला कापसाचा व्यापार अल्प कालावधीच वेगाने काहीपटींनी वाढला.
कापसाच्या या व्यापारामुळे मुंबईचा विकासही तेवढाच वेगाने झाला. या काळातच मुंबईत बँकांचीही संख्या वाढली.
कॉटन बूम आणि कालांतराने तिला लागलेली उतरती कळा याबद्दल बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी आपल्या 'मुंबईचा वृत्तांत' पुस्तकात वर्णन करुन ठेवले आहे.
शेअरची चटक
कापसाचा पैसा शहरात आल्यावर 'बॅक बे रिक्लमेशन' कंपनीला सुरुवात झाली. मुंबईतला काही समुद्राचा भाग बुजवून तिथं भूमी तयार करण्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली.
आचार्य आणि शिंगणे लिहितात, "ह्या वेळी जमिनीची किंमत दुप्पट वाढून शहरांत लोकांची वस्ती फार वाढत चालली होती. जमीन म्हणजे केवळ सोन्याचाच तुकडा होऊन गेला होता. खासगी कंपनीच्या स्वाधीन एवढी जागा करू नये म्हणून बरेच अडथळे आले. मुंबई सरकारच्याही मनात ह्या कंपनीचे 'शेर' ठेवावे असे आले होते; परंतु त्यांस हिंदुस्थान सरकारने तसे न करण्याविषयी लिहून पाठविलें."
"नंतर ह्या कंपनीच्या निःस्सीम भक्तांनी आपापले शेर लेलांव करुन काढून टाकिले. दलालांनी तर 4 हजार रुपयांच्या शेरांची 25 हजार रुपयांपर्यंत किंमत वाढविली! ह्याप्रमाणे ह्या शेरांनी मुंबई शहर अगदी वेडे करुन सोडले होते; ते इतके कीं, शहरांतील बहुतेकांस रात्रीची झोंप व दिवसा जेवणहीं सुचत नसत."
"रस्त्यांतून काय भाव हा शब्द सर्वतोमुखी असे. ह्यां वेळी मुंबई शहर केवळ प्रती 'कुबेरनगरीच' बनून गेले होते, असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. कारण लोकांस पैशाची परवा म्हणून मुळींच नसे; त्यामुळे दिडकीच्या मालाची किंमत रुपयांपर्यंत चढली होती. भाडोत्री गाड्याघोडेवाल्यांची तर चंगळ उडून गेली होती.
आपणांजवळ पैसा नसला तरी कर्ज काढून, अगर घरदार गहाण ठेवून कंपनीचे शेर घ्यावे, ह्यांतच मोठे भूषण आहे, असे बहुतेकांस वाटू लागले म्हणून ह्या काळास 'शेर मनीया' (शेराचे खुळच) म्हणण्याचा प्रघात पडला."
शेअर कोसळण्याचा पहिला दणका
अमेरिकेतलं यादवी युद्ध संपल्यावर त्याचे परिणाम मुंबईवरही दिसून आले.
शिंगणे आणि आचार्य लिहितात, "परंतु ह्या सौभाग्याचा लवकरच शेवट झाला. तो असा की अमेरिकेंत चाललेली लढाई बंद झाली अशी तार ह्या शेरांत गढून गेलेल्या लोकांस समजली. ही बातमी समजल्याबरोबर लोक अगदी हवालदील होऊन गेले.
"कापसाचा भाव एकदम बसला आणि खरे नाणे जाऊन शेर घेतलेल्या कागदांच्या तुकड्यांचेच लोकांस दर्शन होऊ लागलें! ह्या सपाट्यांत पूर्वी मोठ्या भरभराटीस आलेल्या ब्यांका, ल्यांड कंपन्या वगैरे व्यापारी मंडळ्या रसातळास जाऊन पोहोचल्या आणि शेरांनी लोकांस शेर अन्न सुद्धां मिळण्याची पंचाईत केली; जो तो ऊर बडवूं लागला; कित्येकांनी अब्रूस्तव जीव सुद्धां दिले!"
सध्याचं बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज
आज बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या टॉवरला 'जीजीभॉय टॉवर' अशा नावानेही ओळखलं जातं.
मुंबई शहराचे अभ्यासक सिद्धार्थ फोंडेकर यांनी याबद्दल अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "1875 साली नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशनची स्थापना झाली. 1899 साली हे एक्स्चेंज पहिल्या इमारतीत आले. त्यानंतर त्याच जागी 1973 साली एका जागी ते सुरू झालं. फिरोज जीजीभॉय स्टॉक एक्सचेंजचे दीर्घकाळ अध्यक्ष होते त्यामुळे या इमारतीला जीजीजभॉय यांच्या नावाने ओळखलं जातं."