Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाटा समूह एअर इंडिया विकत घेणार

टाटा समूह एअर इंडिया विकत घेणार
सिंगापूर एअर लाइन्सच्या सहभागातून टाटा समूह एअर इंडिया ही विमान कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे. ईटी नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.  एअर इंडियाचे १९५३ मध्ये राष्ट्रीयीकरण झाले होते. यापूर्वी एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची होती.
 
टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी केंद्र सरकारशी अनौपचारिक चर्चांमध्ये एअर इंडिया कंपनीत ५१ टक्के भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारलाही एअर इंडियाच्या वास्तवाची जाणीव असून टाटा समुहाने दिलेल्या प्रस्तावावर सरकारही अनुकूल असल्याचे वृत्तात म्हटले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाला पाठिंबा दिला होता. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सर्व पर्यायांचा विचार करत आहोत, असेही जेटली यांनी त्यावेळी सांगितले होते. एअर इंडियावर सध्या ५२ हजार कोटींचे कर्ज आहे. तसेच एअर इंडियाचा कारभार चालवण्यासाठी केंद्र सरकारने ३० हजार कोटींचे मदतीचं पॅकेज जाहीर केले आहे. यापैकी २४ हजार कोटी रुपये सरकारने एअर इंडियाला आतापर्यंत दिले आहेत. 
 
टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जेआरडी यांनी १९३२ मध्ये टाटा एअर लाइन्स सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये टाटा समूह आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने परदेशातही सेवा देण्याची तयारी टाटा समूहाने दर्शवली. पाच वर्षांनी या एअरलाईन्सची मालकी सरकारकडे गेली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे- नारायण राणे एकत्र येणार